आणखी दोन मुलींचे झाले होते अपहरण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - इंदिरानगर भागात राहणाऱ्या नऊवर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लागल्यानंतर याच संशयित मायलेकी व जावयाने आणखी दोन मुलींचे अपहरण केले होते, त्यांच्या विक्रीची तयारीही झाली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची यापूर्वी नोंद आहे.

औरंगाबाद - इंदिरानगर भागात राहणाऱ्या नऊवर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लागल्यानंतर याच संशयित मायलेकी व जावयाने आणखी दोन मुलींचे अपहरण केले होते, त्यांच्या विक्रीची तयारीही झाली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची यापूर्वी नोंद आहे.

इंदिरानगर भागातील नऊवर्षीय मुलीचे सहा सप्टेंबरला घाटी परिसरातून अपहरण झाले होते. तिच्या विक्रीसाठी अपहरणकर्त्यांनी तिला मुंबईला नेले; पण मुंबई पोलिसांच्या भीतीपोटी त्यांनी खरेदीचा बेत थांबविला होता. या प्रकरणात शिवाजी बळीराम पाटील (वय- ३८, रा. चैतन्यनगर, पडेगाव), त्याची पत्नी उर्षा ऊर्फ प्रिया ऊर्फ वैशाली, तिची आई विमल हिरालाल सरगये यांना अटक झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले; परंतु ओळख परेडसाठी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली. तत्पूर्वी पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी यापूर्वी सातारा परिसरातून एका मुलीचे अपहरण त्यांनी केले होते; पण त्या वेळी स्थानिक राजकीय व्यक्‍तीने हस्तक्षेप केल्यानंतर ‘अर्थ’पूर्ण तडजोड झाली व प्रकरण मिटल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटकेतील वैशाली ऊर्फ वर्षा ऊर्फ प्रिया ही संशयित महिला २०१२ ला बेगमपुरा परिसरातील पार्वतीनगर येथे पहारेकरी म्हणून कामाला होती. त्या वेळी एका मुलीचे तिने अपहरण करून तिला पडेगाव भागात नेले होते. पाच दिवसांनंतर मुलीची तेथून सुटका झाली होती. या प्रकरणात उषा ऊर्फ, प्रिया ऊर्फ वैशाली हिच्यासह अन्य संशयितांविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती; परंतु आता या प्रकरणात काय कायदेशीर कार्यवाही झाली या बाबींची माहिती नसल्याचे या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले.

ओळखू नये म्हणून नाकाला दुखापत
संशयित तीन आरोपींपैकी उषा ही सतत नाव बदलत होती. उषा, वैशाली आणि प्रिया असे नाव बदलत होती. बेगमपुऱ्यातील अपहरण प्रकरणानंतर तिने स्वत:ला कोणी ओळखू नये म्हणून नाकाला दुखापत करून घेतली, अशी माहिती यापूर्वी अपहरण झालेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.

दहा ते बारा वर्षे वयोगटातीलच
जवाहरनगर भागातील मुलींच्या अपहरणानंतर संशयितांनी यापूर्वी बेगमपुरा भागातून; तसेच सातारा भागातून दोन मुलींचे अपहरण केले होते. तीनही अपहरण प्रकरणांतील पीडित मुलींचे वय दहा ते बारा वर्षे असून, या वयोगटातील मुलीच त्या शोधत असत.

Web Title: two girls were abducted