विलासरावांच्या स्मृति दिनी 200 रुग्णालयात मोफत तपासणी

हरी तुगावकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात साथीच्या रोगापासून ते ह्रदयरोग, कर्करोगावरही उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या
स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात साथीच्या रोगापासून ते ह्रदयरोग, कर्करोगावरही उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनेतेच्या सेवेसाठी
नेहमीच प्राथमिकता दिली. त्यांचा स्मृति दिनही लोकोपयोगी व सामाजिक
उपक्रमानेच साजरा व्हावा या आरोग्य शिबिरामागची भूमिका आहे. गेली चार
वर्ष हे शिबिर घेतले जात आहे. २०१४ मध्ये पाच हजार, २०१५ मध्ये सात हजार पाचशे, २०१६ मध्ये दहा हजार व २०१७ मध्ये १८ हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले होते. यावर्षीही डॉक्टरांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २०० रुग्णालयात हे आरोग्य शिबिर होणार आहे. याकरीता विलासराव देशमुख फाऊंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, दंत वैद्यकीय व होमिओपॅथी डॉक्टर संघटनांनी पुढाकार घेतला असल्याचे ते म्हणाले.

या शिबिरात सर्वच वयोगटातील रुग्णांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. ह्रदयरोग, कर्करोग अशा महागड्या उपचार असलेल्या रुग्णांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. तसेच अनेक रुग्णालयात अॅन्जीओग्राफीपासून सिटीस्कॅन, एमआरआय सारख्या तपासण्याही मोफत काही ठिकाणी नाममात्र दरात करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आरोग्या विषयी जागृती वाढण्याची गरज आहे. हा या शिबिराचा उद्देश आहे.
जिल्हाभरातील २०० रुग्णालयाच्या माध्यमातून वीस ते पंचेवीस हजार
रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक्तेप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम होत आहे, असे श्री. देशमुख म्हणाले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. टी. भराटे, सचिव डॉ. जितेन जैस्वाल, निमाचे अध्यक्ष डॉ. विनोद कोराळे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. नितीन शितोळे, डॉ.डी.एन. चिंते, डॉ. अशोक पोतदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहरा्ध्यक्ष मोईज शेख उपस्थित होते.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred free medical checkups on the memory of Vilasrao Deshmukh