गावठी पिस्तुलातून गोळीबारात दोघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

शहरातील वर्दळीच्या परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर गावठी पिस्तूलमधून गोळीबार झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. तुफान दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती.

कळंब - शहरातील वर्दळीच्या परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर गावठी पिस्तूलमधून गोळीबार झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. तुफान दगडफेकीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती.

पारधी पेढीवर समाजाचे कारण (कायरं) होते. अनेकांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याने तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक सुरू झाली. एका गटाने गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास बापू पवार व राहुल बापू पवार अशी जखमींची नावे असल्याची घटनास्थळी चर्चा होती. दरम्यान, हाणामारीत दोन्ही गटांकडून दगड, तलवारी, कोयते, काठ्या, साखळ्यांचा सर्रास वापर उघडपणे करण्यात आला. मार्केट कमिटीच्या प्रांगणातून सुरू झालेल्या बाचाबाचीत पारधी समाजाच्या काही महिलांनी वाद घातला. या महिलांना अडविण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. या घटनेत काहींनी वापरलेली गावठी पिस्तुले, तलवारी कोठून आणल्या, याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, परिस्थिती आटोक्‍याबाहेर दिसताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कटेकर यांनी तालुक्‍यातील पोलिस ठाण्यांत संपर्क साधून अतिरिक्‍त पोलिस कर्मचारी शहरात तैनात केले.
गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकार थांबले होते, परंतु आज दोन गटांतील हाणामारीनंतर गावठी पिस्तूलमधून पाच फैरी झाडण्यात आल्या. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Injured in Pistol Firing Crime Police Bandobast