नांदेडमध्ये दोन किलो वजनाची चांदीची विट जप्त; एकावर गुन्हा दाखल

नांदेडमध्ये दोन किलो वजनाची चांदीची विट जप्त; एकावर गुन्हा दाखल

नांदेड : जुना मोंढा भागातील मुरमुरा गल्लीत राहणाऱ्या एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडून दोन किलो वजनाची चांदीची विट जप्त करण्यात आली. वजिराबाद ठाण्यात संबंधितांवर चोरीचा माल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (ता. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने केली. 

पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या आदेशावरून शहरातील वाँटेड व फरार आरोपींना पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांचे पथक जुना मोंढा भागात कार्यरत होते. यावेळी दिघोरे यांना मिळालेल्या माहितीवरुन, सहकारी राजू पांगरीकर, जसवंतसिंग शाहु, बालाजी सातपुते, तानाजी येळगे, जावेद, घुंगरुसिंग टाकसह मुरमुरा गल्ली भागात आपल्या शासकीय वाहनांद्वारे पोचले.

यावेळी याच भागात राहणारे ट्रान्सपोर्ट चालक मनोज तुळशीराम रौत्रे ( वय ४३) यांच्या हातात दोन किलो ४५० ग्रॅम वजनाची चांदीची विट होती. विट विकण्यासाठी तो सराफा मार्केटमध्ये जाण्यासाठी निघाला होता. सदर व्यापाऱ्यास पंचासमक्ष ताब्यात घेऊन चांदीची विट हस्तगत करून विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे रौत्रे याला ताब्यात घेऊन वजिराबाद ठाण्यात आणले.

चांदीची विट वजिराबाद भागात असलेल्या जे. पी. ज्वेलर्समध्ये आणून तपासणी केली. ती चांदीची असल्याची खात्री पटली. सदर विटेची किंमत 75 हजार 16 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात मनोज रौत्रेविरोधात भा.द.वि. कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किरण पठारे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com