परभणीमध्ये दोघांचा मृत्यू, ८२ पॉझिटिव्ह 

गणेश पांडे 
Tuesday, 29 September 2020

परभणी जिल्ह्यात आज दोनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची संख्या २२४ झाली आहे. आज आणखी ८२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या पाच हजार ३१६ झाली असून चार हजार ५०१ रुग्ण बरे झाले आहेत. ५९१ जणांवर उपचार सुरू आहेत. 

परभणी ः जिल्ह्यात आज दोनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची संख्या २२४ झाली आहे. आज आणखी ८२ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या पाच हजार ३१६ झाली असून चार हजार ५०१ रुग्ण बरे झाले आहेत. ५९१ जणांवर उपचार सुरू आहेत. 

परभणीत दोन जण पॉझिटिव्ह 
परभणी ः शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.२९) शहरातील सात केंद्र, सात खासगी रुग्णालयात ९० व्यक्तींची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ८८ जण निगेटिव्ह तर दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. खानापूर आरोग्य केंद्रात आठ व्यक्तींची तपासणी केली असता दोन जण पॉझिटिव्ह आढळले. सीटी क्लब येथे ३८, शंकर नगर येथील आरोग्य केंद्रात तीन, जायकवाडी मनपा रुग्णालयात सात, खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात चार, इनायत नगर आरोग्य केंद्रात दोन, साखला प्लॉट आरोग्य केंद्रात चार जणांची तपासणी करण्यात आली. तसेच सात खासगी रुग्णालयात २४ जणांची तपासणी केल्याची माहिती नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी दिली. 

हेही वाचा - कोरोनाने अडचणीत भर ; गगनाला गेले दर, कसे बांधावे घर  

मानवतला १४४ जणांवर दंडात्मक कारवाई 
मानवत ः कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे उल्लंघन करणाऱ्या १४४ नागरिकांवर प्रशासनाने मंगळवारी (ता.२९) कारवाई करत एकूण १४ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला. कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात शहरात यापूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती; परंतु मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात न आल्याने उपाययोजनाचा ठिकठिकाणी फज्जा उडत होता. यामुळे कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी तहसील प्रशासन, पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत १४४ जणांकडून १४ हजार चारशे रुपये दंड वसूल केला. 

हेही वाचा - टेबल वर्कच्या कामामुळे वसुली लिपीकांना भरली धडकी 

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सावता माळी चौक, पोलिस स्टेशन, बसस्थानक परिसर, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी करण्यात आली. कारवाईत तहसीलदार डी.डी.फुपाटे, मुख्याधिकारी जयंत सोनवणे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, शेख वसीम, सहायक पोलिस निरीक्षक भारत जाधव, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, मंडळ अधिकारी पी.व्ही.सुरवसे, तलाठी अरविंद चव्हाण, एस.जी.गोस्वामी, कार्यालयीन अधीक्षक एस.एल.बोरेवाड, सचिन सोनवणे, दीपक भदर्गे, सुनील कीर्तने, दिलीप मुरमुरे, नारायण ठमके, फारुकी सहभागी झाले होते. 

मंगळवारी (ता.२९) रात्री साडेसात पर्यंतची आकडेवारी

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - पाच हजार ३१६
आजचे बाधित - ८२
आजचे मृत्यु - दोन
एकूण बरे - चार हजार ५०१
उपचार सुरु असलेले - ५९१
एकूण मृत्यु - २२४

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in Parbhani, 82 positive, Parbhani News