सौरऊर्जेची दोन हजारांवर ग्राहकांनी धरली कास 

अनिल जमधडे
मंगळवार, 21 मे 2019

औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे. 

औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे. 

ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि गळती या दोन प्रकारांनी महावितरणची आर्थिक गणिते बिघडत आहेत; तर दुसरीकडे सातत्याने होणाऱ्या वीज दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनीच आता सौर रूफ टॉप सोलरची कास धरली आहे. सौरऊर्जेचा वैयक्तिक वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक औरंगाबाद शहरात म्हणजे 1,019 ग्राहकांचा सामावेश आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये 90, जालना जिल्ह्यात 124, बीड जिल्ह्यात 103, लातूर जिल्ह्यात 399, उस्मानाबाद जिल्ह्यात 37, हिंगोली 32, नांदेड 302, परभणी 93 याप्रमाणे 2199 ग्राहक मराठवाड्यात सौरऊर्जेचा वापर करून घरगुती विजेची गरज भागवीत आहेत. 

औद्योगिक ग्राहकही 
औद्योगिक क्षेत्रात उच्चदाब विजेचा वापर करणाऱ्यांचाही दिवसेंदिवस सौरऊर्जेकडे कल वाढत आहे. उच्चदाब विजेसाठी सौरऊर्जा वापरणाऱ्यांमध्ये औरंगाबाद शहरात 32, अैरंगाबाद ग्रामीणमध्ये 11, जालना 12, बीड 5, लातूर 8, उस्मानाबाद 3, हिंगोली 1, नांदेड 13, परभणी 3 याप्रमाणे 88 ग्राहकांचा सामावेश आहे. 

काय करावे लागते? 
घरगुती वापारासाठी सौरऊर्जेचा वापर अत्यंत चांगला आहे. एक किलोवॉट व त्यापुढील क्षमतेची सौर सिस्टीम बसविण्यासाठी महावितरणची परवागी घ्यावी लागते. महावितरण एका ट्रान्स्फॉर्मरवरील एकूण दाबाच्या प्रमाणात ग्राहकांना सौरऊर्जा सिस्टीम बसविण्याची परवानगी दिली जाते. सौरऊर्जा सिस्टीम बसविल्यानंतर तयार होणारी वीज ग्राहकाला वापरता येते आणि उरलेली वीज महावितरणला विक्री करता येते. यासाठी नेट मीटरिंगद्वारे तयार झालेली वीज, वापरलेली वीज आणि महावितरणला दिलेली वीज यांचा हिशेब ठेवला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand subscribers of Solar Energy have collected