दोन ते अडीच किलोमीटरच्या रस्त्याची चाळण, नागरिक त्रस्त  

सकाळ वृतसेवा 
Tuesday, 20 October 2020

परभणी शहरातील जायकवाडी वसाहत ते औद्योगिक वसाहत हा अत्यंत महत्त्वाचा, वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. 

परभणी : जायकवाडी वसाहत ते औद्योगिक वसाहत या जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून हजारो नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

जायकवाडी वसाहत ते औद्योगिक वसाहत हा अत्यंत महत्त्वाचा, वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर शेकडो वसाहती असून याच मार्गावरून औद्योगिक वसाहतीत प्रवेश करता येतो. त्यामुळे दुचाकी, चार चाकी वाहने, ऑटोरिक्षा यांची प्रचंड वर्दळ असते. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, व्यापारी संकुले, भाजीपाला विक्री केंद्रे, धार्मिक स्थळांची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे हा रस्ता विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, महिला आदींच्या वर्दळीने गजबजून गेलेला असतो. 

रस्त्यात खड्डे नव्हे तर खड्ड्यात रस्ता 
अतिशय वर्दळीच्या या रस्त्याची ठिकठिकाणी अतिशय दुर्दशा झालेली आहे. जायकवाडी वसाहत व प्रवेशद्वारासमोर भला मोठा खड्डा कसाबसा बुजवला गणपती चौकाच्या समोर पडलेला खड्डा अतिशय धोकादायक झालेला आहे. संपूर्ण रस्ता त्या खड्ड्याने व्यापलेला असून या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात झालेले आहेत. गणपती चौकातून पिण्याच्या पाण्याच्या टाकी कडे जात असतांना जागोजागी खड्डे, रस्त्याला भगदाडे पडलेली आहेत. त्यातून दुचाकी वाहन चालवणे देखील कसरतीचे काम आहे. तेथून पुढे गजानन नगर भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये तर बाराही महिने पाणी साचलेले असते. उघडा महादेव मंदिर व त्यापुढे औद्योगिक वसाहतीकडे जाणार्‍या रस्त्यावर ही ठिकाणी खड्डे पडलेले असून अनेक भागात नालीचे पाणी रस्त्यावर आलेले आहे. 

हेही वाचा - न्यायालयात हजर राहण्याचे आमदार सुरेश धस यांना आदेश -

दोन वर्षापासून दिले जाते चॉकलेट 
महापालिका उघडा महादेव ते एमआयडीसी या रस्त्याच्या काम होणार म्हणून गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना सांगत आहे. त्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन देखील केली परंतू प्रश्न कायम आहे. आयुक्त देविदास पवार यांनी या रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या त्रासाची दखल घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - नांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष

पालिकेने नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे
जायकवाडी ते एमआयडीसी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. विविध वसाहतीतील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने आंदोलने केली आहेत. परंतू, पालिकेने अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. पालिकेने नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे. 
- कैलास लोणसणे, अध्यक्ष, गजानन नगर, परभणी. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two to two and a half kilometers of road culverts, plagued civilians, Parbhani News