टू वे स्पीकरला सशर्त परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - ध्वनिमर्यादेत टू वे स्पीकर वाजविण्यास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परवानगी दिली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून डीजे वाजविल्यास कडक कारवाई करू, संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा आयुक्तांनी दिला. 

औरंगाबाद - ध्वनिमर्यादेत टू वे स्पीकर वाजविण्यास पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परवानगी दिली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून डीजे वाजविल्यास कडक कारवाई करू, संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा आयुक्तांनी दिला. 

डीजे वाद्यवृंद मंडळींची बैठक पोलिस आयुक्तालयात बुधवारी (ता. २०) झाली. यात शहरातील सुमारे तीनशेजणांनी सहभाग नोंदवला. शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. लाडक्‍या बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशा वादक मंडळी खास तयारी करीत आहेत. शिवाय गणेश मंडळांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. परंतु, गणेश उत्सव असो की, महापुरुषांची जयंती वा इतर मिरवणुका यात नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविण्यास न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाआधीच गणेश मंडळांनी डीजेवादक मंडळांकडे डीजेची बुकिंग केली होती. त्यामुळे ध्वनिप्रदूषण व नियमांचे संभाव्य उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आयुक्तालयात डीजे वाद्यवृंद मंडळींची बैठक घेतली. यात पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, गुणाजी सावंत, डी.एन.मुंढे, भापकर, डॉ. अनिता जमादार यांची उपस्थिती होती.

सूचना... इशारा... आवाहन
 गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाजात  डीजे वाजविल्यास डीजेचालकावर थेट गुन्हे दाखल होतील.
 डीजेसह वाहनही जप्त करण्यात येईल. 
 आवाज मोजण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी यंत्रे उपलब्ध. 
 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे.

पर्यावरण कायद्यान्वये दंड
ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यास डीजेचालकास पाच वर्षांची शिक्षा; तसेच एक लाखांचा दंड करण्याची तरतूद आहे. त्यामुळे गणेश मंडळ व डीजेचालकांनी याचे गांभीर्य राखावे व ध्वनिप्रदूषण, गोंगाट टाळावा असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. 

डेसिबल मर्यादा ओलांडणार नाहीत या शर्तीवर टू वे स्पीकर वाजवण्यास परवानगी देत आहोत. ध्वनिमर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त

Web Title: Two Way Speaker Permission Police Crime