आयटीआयऐवजी घेतले दुचाकी चोरीचे शिक्षण

आयटीआयऐवजी घेतले दुचाकी चोरीचे शिक्षण

बीड - आई-वडील मुलांना मोठ्या कष्टाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करून ते चांगली नोकरी करतील, अशी स्वप्नं रंगवत असतात. मात्र, मित्रांच्या कुसंगतीने काही मुले कशी बिघडतात, याचा अनुभव बीडच्या दरोडा प्रतिबंधक विभागाला सोमवारी (ता. 11) आला आहे. बीड जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या सात दुचाकी जप्त करून संशयित तीन चोरट्यांना पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तुकाराम मुरूमकर (वय 21), वैभव भागवत (सानप 20, रा. साकत, ता. जामखेड, जि. नगर) व अजय अशोक माने (वय 23, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) या तिघांच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. या तिघांनाही त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी अहमदनगर येथे पाठविले. तिघांनीही सोबतच आयटीआयला प्रवेश घेतला. तिघे चांगला अभ्यास करू लागले; परंतु नंतर त्यांना बाहेर फिरण्याचा व पार्ट्या करण्याचा नाद लागला. जवळचे पैसे संपल्यानंतर पार्ट्या कशा कराव्यात हा प्रश्न तिघांसमोर यायचा. यानंतर गणेशने दुचाकी चोरीचा फंडा मित्रांसमोर ठेवला व क्षणाचाही विलंब न करता तिघांचेही एकमत झाले. नंतर तिघांनी मिळून नगर व बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचा सपाटा लावला. दरम्यान, या तिघा चोरांचा पोलिसांना सुगावा लागला. हे तिघेही सोमवारी जामखेड येथे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांना मिळाली. त्यांनी पथकासह सापळा लावून तिघांनाही पकडले व पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. तिघांकडून बीड जिल्ह्यातून चोरी गेलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तिघांकडून अन्य गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्‍यता आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, संजय खताळ, राजेभाऊ नागरगोजे, बबन राठोड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भारत बंड, सुबराव जोगदंड, महेश चव्हाण, दिलीप गित्ते, महेश भागवत, अंकुश दुधाळ, नारायण साबळे आदींनी ही कारवाई केली. 

मुलांकडे लक्ष देण्याची गरज 
अनेक वेळा आमचा मुलगा मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. लवकरच तो अधिकारी होणार, अशा विचारात पालक वावरत असतात. शिक्षणासाठी पैसा पुरवितात; परंतु त्यांचे मित्र कसे आहेत, सध्या तो शिक्षणच घेत आहे का? याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही पालक मुलांकडे बिलकूल लक्ष देत नाहीत. यामुळे अनेक वेळा मित्रांच्या संगतीने मुले वाया जाताना दिसत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com