कर्जाला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

- कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून एका विद्यार्थ्याने आणि एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या दोन घटना बीड येथे घडल्या.

बीड : एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून तर आर्थिक विवंचनेतून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या दोन घटना सोमवारी (ता. 23) जिल्ह्यात समोर आल्या.

नागेश भिकाजी नाईकवाडे (वय 25, रा. देवडी, ता. वडवणी) असे शेतकऱ्याचे नाव असून योगेश किशन राठोड (वय 20, रा. घनखिळ तांडा, ता. धारुर) असे आत्महत्या केलेल्या विद्यर्थ्याचे नाव आहे. 

शेतात पेरणी आणि इतर कामांसाठी घेतलेले कर्ज फिटत नसल्याने नागेश नाईकवाडे चिंतेत होते. सोमवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन विष प्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यामागे पाच भाऊ, एक बहीण व आई - वडील असा परिवार आहे.

तर दुसरी घटना धारूर तालुक्यांतील मोहखेड शिवारातील धनखिळा तांडा येथे घडली. योगेश राठोड या तरुणाने आर्थिक विवंचनेतून शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आंबेजोगाई येथे विज्ञान पदवीचे शिक्षण सुरु होते. मागच्या वर्षी शेतात काही पिकले नाही. त्यामुळे त्याला महाविद्यालयीन शिक्षण सोडून ऊस तोडणीला जावं लागले. या वर्षी सुध्दा तशीच वेळ येते की काय? असं त्याला सारखं वाटतं होतं. त्यांतच घरातलं दारिद्र यामुळे, आर्थिक चिंतेतुन गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two young farmers commit suicide due to loan