दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात चक्का जाम, निदर्शने

गणेश पांडे
Thursday, 3 December 2020

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, कृषि उत्पन्न बाजार समिती कायदा बळकट करा, किमान आधारभूत किंमत कायदा कायम ठेवून या कायद्यानेच देशभर शेती माल खरेदी करा, किमान आधारभूत किंमतीच्या खाली शेती मालाच्या किंमती येऊ देऊ नका या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत

परभणी ः सुकाणू समितीच्या वतीने विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.तीन)  दुपारी १२ वाजता पोखर्णी फाटा (ता.परभणी) येथे शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करून दिल्ली येथे लढणारयां शेतकऱ्यांना समर्थन दिले. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांसदर्भात केलेले कायदे रद्द करावे अशी मागणी करून केद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, कृषि उत्पन्न बाजार समिती कायदा बळकट करा, किमान आधारभूत किंमत कायदा कायम ठेवून या कायद्यानेच देशभर शेती माल खरेदी करा, किमान आधारभूत किंमतीच्या खाली शेती मालाच्या किंमती येऊ देऊ नका या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. दोन दिवसांत दिल्ली आंदोलनातील मागण्या मान्य करून तोडगा सरकारने नाही काढला तर ता. ५ डिसेंबर रोजी ग्रामीण भाग बंद करून शेतकरी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी विलास बाबर यांनी दिला.  आंदोलनात मदनराव वाघ, नरहारी वाघ, शिवाजी सोनवने, परसराम रासवे, राम वैरागर, गणेश वाघ, व्यंकटी आव्हाड, अशोक साखरे, विष्णू मोगले, तुकाराम कानडे, गोविंद भांड, सुरेश कच्छवे, भास्कर कच्छवे, अर्जुन कच्छवे, अंकुश तवर, वैजनाथ कच्छवे, भास्कर खुपसे, नागेश वाघ, राजेभाऊ सुर्यवंशी, रामा गव्हाणे, शिवाजी बंदाले आदी शेतकरी सहभागी झाले. आंदोलनामुळे गंगाखेड - परभणी मार्गावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प पडली होती.

हेही वाचा दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास -

शेतकरी संघर्ष समितीची परभणीत निदर्शने

परभणी ः केंद्र सरकारने केलेले शेतकऱ्या संदर्भातील कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी परभणीत गुरुवारी (ता.तीन) शेतकरी संघर्ष समितीच्यवतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात केंद्र सरकारने राज्यसभेत बहुमत नसतांनाही हुकूमशाही पध्दतीने शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहेत असा आरोप करण्यात आला आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे ता. 26 नोव्हेंबर पासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनास परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समर्थन दिले असून त्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता.तीन) शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्ली येथील आंदोलनकर्त्या 12 हजार शेतकऱ्यावरील पोलिस केसेस मागे घ्याव्यात, तीन कायदे व प्रस्तावित विज कायदा रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात राजन क्षीरसागर, दादासाहेब टेंगसे, माणिकराव कदम, अमोल जाधव, बाळासाहेब देशमुख, शिवाजी कदम, सोनाली देशमुख, नदीम इनामदार, मिन्हाज कादरी,  राजेश बालटकर, विष्णू सायगुंडे, सुरेश देसाई आदी सहभागी झाले होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tyre Jam, demonstrations in Parbhani district in support of the agitation in Delhi parbhani news