छत्रपती उदयनराजेंनीच नेतृत्व करावे, मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी केले आवाहन

दत्ता देशमुख
Wednesday, 16 September 2020

‘‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा समाज मानाचे स्थान देत असला तरी, ते समाजासाठी बोलायला तयार नाहीत. यामुळे राज्यातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचे नेतृत्व करावे’’, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले.

बीड : ‘‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा समाज मानाचे स्थान देत असला तरी, ते समाजासाठी बोलायला तयार नाहीत. यामुळे राज्यातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचे नेतृत्व करावे’’, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले.

मराठा आरक्षणाबाबत येथे मंगळवारी (ता. १५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मेटे म्हणाले, ‘‘राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.

मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या...

२८ जुलै २०२० ला महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण मिळत असल्यामुळे १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा अन्यायपूर्वक काढलेला आदेश तत्काळ रद्द करून आर्थिक दुर्बल घटक आरक्षण लाभ मराठा समाजाला मिळवून द्यावा. आरक्षण स्थगितीमुळे मराठा समाजातील मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रवेशावर आणि त्यांच्या शुल्कावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे म्हणून आघाडी सरकारने सर्व मराठा समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च, शुल्क शासनाने भरावे.

यात आयटीआयपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय, आर्किटेक्चर, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास, विविध पदवी, पदविकासह सेवा अभ्यासक्रमाचा समावेश असावा. आघाडी सरकारने बंद पडलेल्या सारथी संस्थेतील तारादूत सारखे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प बंद केले, शिष्यवृत्तीही मिळत नाही, कर्मचारी वर्ग काढून टाकला आहे. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. सारथी संस्थेच्या माध्यमातून सर्व शिक्षणाचे काम, अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सारथीला १ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा’’, अशी मागणीही आमदार मेटे यांनी यावेळी केली.

'ते' रुग्णालयात आले अन् सुरु केली व्हेंटिलेटरची पूजा ! 

चव्हाणांनी राजीनामा द्यावा
‘‘अशोक चव्हाण यांना वारंवार सांगूनदेखील त्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आरक्षणाच्या स्थगितीला या सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे’’, असे मेटे म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale To Be Come Forward For Maratha Reservation