बापरे! ठाकरेंच्या शपथविधीचा खर्च फडणविसांपेक्षा...

तानाजी जाधवर
बुधवार, 15 जानेवारी 2020

मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीमध्ये पाचव्या मजल्यावरील राजशिष्टाचार शाखेतील सर्व अभिलेख नष्ट झाले आहेत.

उस्मानाबाद : भाजप सरकार 2014 साली अस्तित्वात आले होते, त्यावेळी मोठ्या दिमाखात शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता 2019 ला तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करीत राज्याचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविले. श्री. ठाकरे यांचा शपथविधी सोहळादेखील थाटामाटात पार पडला. त्यामुळे या दोन्ही शपथविधीमध्ये कोणाचा खर्च अधिक झाला हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

मुरुम (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील निखील चनशेट्टी यांनी  माहिती अधिकारात एक ऑक्टोबर 2009 ते 30 नोव्हेंबर 2019 या काळातील मुख्यमंत्री शपथविधीकरीता झालेल्या खर्चाची माहिती विचारली होती. त्याची माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन देण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या आगीत जळाली कागदपत्रे

मात्र 21 जून 2012 रोजी मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीमध्ये पाचव्या मजल्यावरील राजशिष्टाचार शाखेतील सर्व अभिलेख नष्ट झाले आहेत. त्यामुळे 2009 ते 2012 पर्यंतची माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

2014  व 2019 च्या दोन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर 2014 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी 98 लाख 37 हजार 950 रुपये एवढा खर्च झाला होता.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

यामध्ये निमंत्रण पत्रिका, फाईल फोल्डर या दोन्हीवर चार हजार रुपये, सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांवर सव्वा सात लाख रुपये, वानखेडे स्टेडीयम येथील विद्युत खर्च 30 लाख 60 हजार रुपये, शामियाना व इतर अनुषंगिक खर्च हा 67 लाख रुपयांवर केला गेला होता. एकुण खर्चाचा आकडा 98 लाखावर गेला होता.

फडणविसांच्या अडीच पट खर्च

उध्दव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या सोहळ्याचा खर्च दोन कोटी 79 लाखांवर गेल्याचे दिसून येत आहे. दादर येथे पुष्पसजावट तीन लाख रुपये, तर दादरच्या शिवाजी पार्कवरील विद्युतीकरणाच्या कामाचा खर्च तब्बल दोन कोटी 76 लाख इतका झाल्याचे दिसून येत आहे.

तुलनेने उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस सरकारपेक्षा दीड कोटींहून अधिक खर्च जास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Devendra Fadanvis Oath Ceremony Mumbai Maharashtra News