नांदेडात उध्दव ठाकरेंचे फलक झळकले

फोटो
फोटो

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण पसरले आहे. अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून मंगळवारी (ता. २६) रात्रीपासून शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाके फोडण्यासह पेढे वाटपाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. 

पक्षप्रमुख ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करण्यात सुरुवात केली. नांदेडला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आसना बायपास, सांगवी परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले तसेच फलकही लावले.

विधानसभेवर शेवटी भगवा 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली. राज्यात ठाकरे सरकार येत असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खऱ्या अर्थाने स्वप्न साकारले जात आहे. विधानसभेवर शेवटी भगवा फडकल्याने राज्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून काही ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा केला. 

आसना बायपास सांगवीत जल्लोष


जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आसना बायपास परिसरात फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर, चौकात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मोठमोठे फलक झळकले. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा या फलकाद्वारे देण्यात आल्या. 

शेतकऱ्यांचा जानता राजा

राज्याला खऱ्या अर्थाने उध्दव ठाकरे यांच्या रुपामुळे शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून मुख्यमंत्री मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी सतत अहोरात्र लढणारा तसेच त्यांच्या शेतात, बांधावर जावून अश्रु पुसणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निवडणुका संपल्यानंतर त्यांनी स्वत: राज्यभर पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी समजावून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिवसेना तुमच्या सोबत असल्याचा विश्‍वास दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने राज्यभरातील तळागाळातील व शेवटच्या टोकापर्यंत राहणारा शिवसैनिक आनंदीत झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिली. 

कार्यकर्ते व शिवसैनिक मुंबईकडे रवाना

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बुधवारी (ता. २७) शपथविधी सोहळ्यासाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही वाहनाने तर काहीजण रेल्वेने मुंबईला रवाना झाले आहेत. काही जण विमानाने नांदेडहून मुंबईला गुरुवारी (ता. २८) सकाळी जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com