esakal | उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Nilangekar Visit Damaged Farm

भाजपचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी गुरुवारी (ता.१५) केली.

उद्धव ठाकरेंनी फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता महाराष्ट्राचा विचार करावा, भाजपचे माजी मंत्री निलंगेकरांचा सल्ला

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे फक्त बांद्राचे मुख्यमंत्री न राहता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा. मुंबई सोडूनही लोक राहतात असा सल्ला भाजपचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. निलंगा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी गुरुवारी (ता.१५) त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. श्री.निलंगेकर म्हणाले, की सरकारने प्रशासनाला योग्य ती सूचना देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल अशा उपाययोजना कराव्यात.

खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान

शेतकऱ्यांना जिरायतला एकरी ५० हजार व बागायत शेतीला एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकरी या असंवेदनशील सरकारला माफ करणार नाही. शेतकऱ्यांना लॉट्री पद्धतीने बियाणे देण्याच्या सूचना महाविकास आघाडी सरकारने जिल्हा प्रशासनाला केल्या असल्याची माहिती संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी श्री.निलंगेकरांना लक्षात आणून दिली. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत त्यांनी बांधावरून थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फोन लावला व मागणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावेत.

या करिता उच्चस्तरावर मागणी करून अतिरिक्त बियाणे साठा करावा, अशा सूचना श्री.निलंगेकर यांनी दिल्या. निलंगा मतदारसंघातील संपूर्ण मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. अशा भागांची बांधावर, जाऊन गुरूवारी पाहणी करत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरसकट ५० हजार व बागायत शेतीला एक लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारला केली आहे.

लातूर : विद्यार्थ्यांवर कोरोनाचे मोफत उपचार; स्वास्थ कोविड सेंटरचा निर्णय

तालुक्यातील औराद शहाजानी, माने जवळगा, सावरी, तगरखेडा, वांजरखेडा, गुंजरगा, माकणी, हलगरा, हालसी या भागातील शेताची श्री.निलंगेकर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, संजय दोरवे, रज्जाक रकसाळे आदी होते. या पाहणी दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. औरादशहाजानी येथील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बागायत व सोयाबीन नुकसानीची पाहणी करत असताना संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला व पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. अन्यथा मला वेगळ्या मार्गाने मागावे लागेल असा इशाराही श्री. निलंगेकर यांनी यावेळी थेट बांधावारून सरकारला दिला.

बियाणे, खते देणार
औराद शहाजानी भागातील नुकसानीची पाहणी करत असताना एक शेतकरी धावून आला व माझे संपूर्ण नुकसान झाले आहे. माझे कुटुंब उघड्यावर आले आहे. शेती उत्पन्नावर माझा उदरनिर्वाह भागतो आहे, परंतु अतिवृष्टीने माझ्या हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याचे सांगत येणाऱ्या रब्बी हंगामाकरीता बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली. यावेळी या शेतकऱ्याला धीर देत आमदार निलंगेकर यांनी बियाणे व खते तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

संपादन - गणेश पिटेकर