उमरगा : पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले २२ कोटी ३४ लाख

अविनाश काळे 
Friday, 20 November 2020

ऐन दिवाळीत झाली महसूल व बँक कर्मचाऱ्यांची धावपळ; अर्धीच रक्कम प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्षा दुसऱ्या टप्प्यातील रक्कमेची. 

उमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीनंतर रक्कम वर्ग झाली असुन १० नोव्हेंबरला प्राप्त झालेली २२ कोटी ३४ लाख ६० हजार सातशे रुपये अनुदान प्राप्त झाले होते. ऐन दिवाळीत रक्कम प्राप्त झाल्याने बँकाच्या सुट्या आल्याने १७ नोव्हेंबरला प्राप्त झालेली सर्व रक्कम वर्ग झाली. दरम्यान एकुण अनुदान रक्कमेच्या पन्नास टक्के अनुदानाची रक्कम पहिल्या टप्प्यात प्राप्त झाल्याने मिळणाऱ्या एकूण अनुदानापैकी पन्नास टक्के अनुदानाची रक्कम वर्ग झाली आहे. उर्वरीत रक्कम केंव्हा मिळेल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालूक्यात ४४ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याने एकुण ४४ कोटी ५६ लाख, ४५ हजार रुपये अनुदान रक्कमेची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निम्मीच रक्कम प्राप्त झाली आहे, त्या रक्कमेचा वितरण कशा पद्धतीने करायचे याबाबतचा निर्णय झाला आणि प्राप्त झालेली रक्कम प्रत्येक लाभार्थींना त्यांना मिळणाऱ्या एकुण रक्कमेच्या निम्मी रक्कम वर्ग करण्याचा निर्णय झाला. महसूल प्रशासनाने लाभार्थी याद्यांचे पूर्वनियोजन केल्याने गुरुवारी (ता.१२) आयसीसीआय बँकेत रक्कम जमा करण्यात आली होती. शुक्रवारी (ता.१३) पन्नास हजार ४९० लाभार्थ्यांपैकी जवळपास वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करता आली. त्यानंतर सलग तीन सुट्टया आल्याने मंगळवारी (ता. १७) सर्वच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २२ कोटी ३४ लाख, ६० हजार सातशे रुपये जमा करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उर्वरीत अनुदान रक्कमेची प्रतिक्षा
अतिवृष्टीने एका दिवसात पिकासह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. तेंव्हा सत्ताधारी, विरोधक नेतेमंडळींनी पाहणी करून दिलासा देण्याचे आश्वासन दिले मात्र जाहिर झालेली मदत ही तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनुदानाची जाहिर केलेली रक्कमही पन्नास टक्केच आली ; तीही दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात रक्कम मिळू शकली नाही. उर्वरीत जवळपास बावीस कोटीची रक्कम तातडीने जमा केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

 

तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांच्या याद्या व अनुदान रकमेचा धनादेश प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून पहिल्या दिवशी वीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली. कांही खात्याचे आयएफसी कोड चुकीचे आल्याने महसूल विभागाने त्याची तातडीने दुरुस्ती करून दिली. सुट्याचा कालावधी आल्याने थोडा विलंब झाला मात्र मंगळवारपर्यंत सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. - एन.आर. राठोड, शाखा प्रबंधक आयसीसीआय बँक

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga fifty thousand farmers account credited 22 crore 34 lakhs