‘या’ शहरात वाढले अनधिकृत बांधकाम

फोटो
फोटो

नांदेड : ग्रामिण भागात रोजगाराच्या संधी तसेच चांगल्या शिक्षण व आरोग्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने दिवसेंदिवस शहरांकडे येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नांदेड शहरही याला अपवाद राहिले नसून नांदेड शहरासह आजूबाजूला असलेल्या नगरामध्ये वस्ती वाढत चालली आहे. मात्र हे होत असतानाच दुसरीकडे शहरात अनाधिकृत बांधकामासह शासनाच्या रिकाम्या भूखंडावर अतिक्रमण करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनासह ग्रामपंचायत व महापालिकेने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. 

नांदेडसह आजूबाजूच्या वाडी, विष्णुपुरी, वाजेगाव आदी ग्रामपंचायतीसह शहरातील महत्वाच्या भागामध्ये नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर ग्रामिण भागातून कुटुंबे स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे वाढीव वस्ती झपाट्याने निर्माण होत असून काही भागात मिळेल त्या ठिकाणी आणि जागेवर राहणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीसह महापालिकेचेही दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर शासनाच्या रिकाम्या भूखंडावरही होणाऱ्या अतिक्रमणाकडे लक्ष नाही. 

मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम

अतिक्रमणांसह अनेक ठिकाणी जास्तीचे म्हणजेच मंजूर नकाशाविरुद्धचे बांधकाम होत आहे. ‘एफएसआय’कडे लक्ष दिले जात नसून अनेक ठिकाणी उंच इमारती, अपार्टमेंट, व्यापारी संकुल उभी राहत आहेत. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यातील बहुतांश बांधकामे नियमानुसार होत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मात्र, प्रशासनातील संबंधित विभाग आणि कार्यालये सुस्त झाली आहेत.

भविष्यात होऊ शकतात अडचणी

या घटनांकडे वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. काही ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे तर काही ठिकाणी रस्तेच बंद करुन टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, शहरालगतच्या ग्रामपंचायत तसेच शहर व ग्रामिणचा नगररचना विभाग यांनी एकत्र येऊन कार्यवाही करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी, आयुक्तांना द्यावे लागणार लक्ष

अतिक्रमणासोबतच जास्तीच्या बांधकामावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी नांदेड शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती तसेच महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयनिहाय विशेष पथक नेमून कार्यवाही करण्याची गरज आहे. संबंधित मालमत्ताधारकांवर कार्यवाही करुन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली पाहिजे. 

अतिक्रमण काढण्याची कार्यवाही


महापालिका हद्दीत आयुक्त लहुराज माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षेत्रीय कार्यालयासह नगररचना विभागाची बैठक घेण्यात आली. त्यानुसार महापालिकेचे रस्ते किंवा रिकामे भूखंडावरील अतिक्रमण असेल तर ते काढण्यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पोलिस विभागाची मदतही घेण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कारवाईस सुरुवात करण्यात येणार असून त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.
अजितपालसिंघ संधू, उपायुक्त, महापालिका.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com