घाण पाण्यावर स्नान अन्‌ जनावरांची तहानही!

एकुर्का (ता. जळकोट) - तिरू नदीकाठी असलेल्या आडातील गढूळ पाणी.
एकुर्का (ता. जळकोट) - तिरू नदीकाठी असलेल्या आडातील गढूळ पाणी.

एकुर्का (ता. जळकोट, जि. लातूर) - मराठवाड्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, ग्रामीण भागाची होरपळ सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जळकोट तालुक्‍यातील एकुर्का येथील स्थिती बिकट असून चूळ भरणे, स्नानासाठी घाण पाण्याचा वापर करावा लागत आहे. जनावरांची तहानही याच पाण्यावर भागवावी लागत असल्याचे दाहक वास्तव गावातील गुणाबाई केंद्रे यांनी मांडले.

साडेचार हजार लोकवस्तीच्या या गावात फेब्रुवारीपासून पाणी नसल्याने वणवण सुरू आहे. ‘प्यायलाबी पाणी मिळेना, शेतात काय’, असा सवाल तेथील ग्रामस्थांनी केला. काही व्यापारी जळकोट शहरातून पाण्याचे जार विक्रीसाठी आणत असले तरी आम्हाला विकतचं पाणी परवडत नाही. त्यासाठी तीनशे रुपये मोजावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गावाजवळून तिरू नदी जाते. ती सध्या कोरडी आहे. नदीवर बांधलेला बंधाराही फुटला आहे. गावासाठी कायमस्वरूपी जलस्रोत नाहीत. शुद्ध पाण्यासाठी आरओ बसविण्यात आला होता. त्यात गाळ गेल्याने तोही बंद पडला आहे. नदीकाठच्या आडात अल्पसे पाणी असते; मात्र तेही गढूळ. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा, अशी स्थिती आहे. एखादा पाणी आणण्यासाठी गेला तर तो घरी येईपर्यंत दहा तास लागतात, असे ग्रामस्थ सांगतात.

जनावरांच्या आरोग्यावर परिणाम 
गढूळ पाणी पाजल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशा पाण्यामुळे तीन हेल्यांचा जीव गेल्याचे ग्यानोबा भांगे या दहावीतील मुलाने सांगितले. चारा-पाणीटंचाई, उष्णतेमुळे दुग्धोत्पादनात घट झाली असून, जनावरांना गारवा मिळावा म्हणून गावातले काहीजण (पैसे असणारे) कूलरचाही वापर करीत असल्याचे तो म्हणाला.

महिलांचे हाल
पाणी मिळविण्यासाठी टेकडी चढण्यासह भटकंती करावी लागत असल्याने गावातील महिलांना गुडघे, पाठ व डोकेदुखी आदी व्याधी जडल्या आहेत. पिण्यासाठी विकतचे पाणी परवडत नसल्याने त्यांना दूरवर जावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com