नाथसागरात नितळ पाणी पण शहरात पिवळे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - नाथसागरातून नितळ शुद्ध पाणी मिळत असताना शहरात मात्र अद्याप पिवळ्या पाण्याचाच पुरवठा सुरू आहे. प्रशासन १३ ठिकाणचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवून मोकळे झाले आहे. पाणी नेमके कोठे दूषित होते, याचा शोध घेण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

औरंगाबाद - नाथसागरातून नितळ शुद्ध पाणी मिळत असताना शहरात मात्र अद्याप पिवळ्या पाण्याचाच पुरवठा सुरू आहे. प्रशासन १३ ठिकाणचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवून मोकळे झाले आहे. पाणी नेमके कोठे दूषित होते, याचा शोध घेण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

दूषित पाण्यामुळे पदमपुरा व अंबिकानगरमध्ये साथीचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तसेच शहरात अनेक भागांत दूषित पिवळे पाणी नळाला येत असल्याच्या तक्रारी थेट महापौरांकडे करण्यात आल्या होत्या. त्यांनी फारोळा येथील जलशुद्धीकरणाला अचानक भेट दिली होती. यावेळी तेथील पाण्याचे नमुने घेण्यात आले. याठिकाणी महापौरांसह पदाधिकाऱ्यांना पाण्याची शुद्धता दाखवून देण्यात आली. नाथसागरात सध्या शुद्ध पाणी असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शहरातच पाणी दूषित होत असल्याची शक्‍यता आहे. छावणी परिसरात काही महिन्यांपूर्वीच गॅस्ट्रोने हाहाकार उडाल्याने महापौरांनी दूषित पाण्याची गंभीर दखल घेत शहर अभियंता सखाराम पानझडे यांची चौकशी समिती नियुक्त केली. समितीने तेरा ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे; मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. असे असताना दुसरीकडे पिवळ्या पाण्याचा पुरवठा सुरूच आहे. पाण्याच्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर त्याच भागात नेमके कोणत्या कारणामुळे पाणी दूषित होत आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी मात्र अहवालाची प्रतीक्षा प्रशासनाकडून सुरू आहे.

आरोग्य धोक्‍यात
बहुतांश भागात नळाला पिवळसर पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यात पाणीपुरवठा दोनवरून पाच दिवसांवर गेल्याने त्रासात भरच पडली आहे. 

Web Title: uncleaned water supply