आगळावेगळा उपक्रम ; ‘डॉग हॅन्डलर्स’नी घेतले श्वान आरोग्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण... 

गणेश पांडे
Wednesday, 12 August 2020

राज्यातील श्वानपथक नियंत्रित करणाऱ्या ४५० श्वान हस्तकांना श्वान आरोग्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षणाचा सात दिवसीय उपक्रम परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय यांच्या पुढाकाराने (ता.तीन) ऑगस्ट रोजी झाला. 

परभणी ः राज्यातील श्वानपथक नियंत्रित करणाऱ्या ४५० श्वान हस्तकांना श्वान आरोग्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षणाचा सात दिवसीय उपक्रम परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय यांच्या पुढाकाराने (ता.तीन) ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या प्रशिक्षणातून राज्यात गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान हस्तकांसाठी प्रशिक्षण सुविधा कायमस्वरूपी निर्माण करण्याचा विचार मांडण्यात आला.

गुन्हे अन्वेषण विभागातील हस्तक कर्मचाऱ्यांना श्वान आरोग्य व्यवस्थापनाची दैनंदिन काळजी घ्यावी लागते. मात्र, त्यासाठी सध्या राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते. निरंतर तांत्रिक माहितीसाठी प्रशिक्षण आणि श्वान चिकित्सा सुविधा राज्यात जिल्हा पशु सर्वचिकात्सालये आणि पशुवैद्यक विद्यापीठातील महाविद्यालयात असताना श्वान हस्तकासाठी मोठी सोय साधता येणे शक्य असल्याचे मत प्रशिक्षणाचे आयोजक आणि परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नितीन मार्कंडेय यांनी या वेळी व्यक्त केले.

प्रशिक्षणार्थींना तांत्रिक साहित्य, प्रमाणपत्राचे वितरण
प्रशिक्षणात गुन्हे अन्वेषण विभागाचे पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्राचे उपअधीक्षक लांडगे, धुळे येथील अतिरीक्त पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ, सशस्त्र सीमा बलाच्या राजस्थान श्वान प्रशिक्षण केंद्राचे पशुवैद्यक उपकमांंडंट डॉ. सुशांत पारेकर, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, श्वान तज्ञ डॉ. आनंद देशपांडे, गोरेवाडा वन्यजीव संगोपन केंद्राचे डॉ. शिरीष उपाध्ये, पशुकृत्रीम बुध्दीमत्ता विषयाचे अभ्यासक डॉ. विवेक देशमुख यासह विद्यापीठाच्या इतर तज्ञ मंडळींनी प्रशिक्षणात तांत्रिक माहिती दिली. प्रशिक्षणाचे आयोजन समन्वयिका डॉ. मीरा साखरे, सहसमन्वयक डॉ. सतिश गायकवाड आणि डॉ. तोहीद शफी यांनी केले. प्रशिक्षणार्थींना तांत्रिक साहित्य, प्रमाणपत्र वितरण करुन त्यांचे शंका निरसनही केले.

हेही वाचा - दिलासादायक ! अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या अस्थमाग्रस्त आजीने केली कोरोनावर मात

निरंतर समन्वय साधण्याची गरज 
राज्य पातळीवर श्वान आरोग्यात सुधारणा अवलंबण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि गुन्हे अन्वेषण विभाग निरंतर समन्वय साधणार असल्याची माहिती किशोर नाईक यांनी दिली. श्वान जातीचे स्वभाव गुणधर्म डॉ.प्रज्ञेय ताकसांडे यांनी विशद केले. श्वान आरोग्य प्रशिक्षणात आहार आणि आरोग्य सक्षमीकरणांसाठी डॉ. विठ्ठल मुंडे, डॉ.सुमित वानखेडे, डॉ.सुधीर बोरीकर ,डॉ. मुजीब सय्यद यांनी सादरीकरण केले तर प्रा.डॉ.बाबासाहेब नरळदकर यांनी परजीवी नियंत्रणावर भर देत जंतनाशक उपक्रमाबाबत माहिती दिली. वनस्पतीजन्य औषधींची प्रतिबंधात्मक उपचार पेटी श्वान पथकांसाठी आवश्यक असल्याचे डॉ. सुधीर राजूरकर यांनी विशद केले तर दर सहामाही नमुना रक्त तपासणीतून श्वान आरोग्य सवंर्धनाबाबत डॉ. प्राणेश येवतीकर आणि डॉ. गोविंदं गंगणे यांनी तांत्रिक माहिती दिली. श्वान दैनंदिन व्यवस्थापन पध्दती डॉ. मकरंद खरवडकर यांनी सांगितल्या.

हेही वाचा - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘वंचित’चे पदाधिकारी रस्त्यावर, कुठे ते वाचा...

ऑनलाइन श्वान आरोग्य प्रशिक्षणाबाबत समाधान
राज्यातील सर्व श्वानपथकातील श्वानहस्तक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते आणि अशा प्रशिक्षणाची नियमित सोय विद्यापीठातर्फे उपलब्ध व्हावी, असे प्रतिपादन केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आशिष पातरकर यांनी सदरील मोफत ऑनलाइन श्वान आरोग्य प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique activities; Online training on dog health conducted by 'Dog Handlers' ..., Parbhani News