गदर्भ स्वारी 'विड्या' ची परंपराच न्यारी; नव्वद वर्षांची परंपरा जपण्यासाठी जावई शोधण्यासाठी विडेकरांची दमछाक

विडा येथे मागील नव्वद वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक (धिंड) काढण्याची परंपरा आहे. यावर्षीचा मानाचा जावाई शोधण्यासाठी विडेकरांना फार मोठी कसरत करावी लागली.
Unique Tradition of Donkey Riding in Vida Villagers Desperate to Find Son-in-Law to Keep 90-Year-Old Tradition Alive
Unique Tradition of Donkey Riding in Vida Villagers Desperate to Find Son-in-Law to Keep 90-Year-Old Tradition AliveSakal

केज : विडा येथे मागील नव्वद वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक (धिंड) काढण्याची परंपरा आहे. यावर्षीचा मानाचा जावाई शोधण्यासाठी विडेकरांना फार मोठी कसरत करावी लागली.

अगदी शेवटच्या टप्प्यात सिंधी येथे सोमवारी एकवेळा तावडीतून पळून गेलेल्या जावायास पकडण्यात यश आले. सोमवार (ता.२५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धुलीवंदनाची गदर्भ स्वारीची डिजेच्या संगीतावर तरूणांनी ठेका धरत मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

संपूर्ण राज्यात चर्चा असणाऱ्या विड्यातील धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीतील जावयाचा या वर्षीचा मान गावातील एकनाथ पवार यांचे सिंधी (ता.केज) येथील जावाई संतोष जाधव यांना भेटला.

हा मानाचा जावाई एकदा पळून गेला तरी बऱ्याच प्रयत्नानंतर सोमवारी सकाळी सिंधी येथे पकडण्यात आला. ही नव्वद वर्षापासून चालत आलेली परंपरा तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला प्रथमतः मिरवण्यात आले तेंव्हापासून सुरू झाली.

या परंपरेत अद्यापही खंड पडलेला नाही. एवढ्या वर्षाच्या या उत्सवात एकवेळही साधी कुरबुर देखील झाली नाही. कारण या मिरवणूकी दरम्यान धुलीवंदन असूनही एकही व्यक्ती मद्यमान केलेला आढळून येत नाही, हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे.

आतापर्यंत गावातील सर्वच समाजाच्या जावायांना हा मान मिळालेला आहे. विशेष म्हणजे एकदा मिरविलेला जावाई पुन्हा मिरवला जात नाही. नवा जावाई नवी गदर्भ स्वारी असल्यामुळे यातून मिळणारा सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

एकदा जावई पकडला की तो कोणा एकाचा न राहता साऱ्या गावाचा होऊन जातो. इतर वेळी लग्नात घोड्याचा हट्ट करणारे जावई एकदा हाती लागले की, कसलेही आढेवेढे न घेता गुमान गाढवावर बसतात. मिरवणूकीत चपल-बुटांचा हार घातलेले गाढवं, त्यावर जावयाला बसवून गावाभरं वाजत-गाजत उत्साहात मिरवणूक (धिंड) काढण्यात आली.

मिरवणूक पार पडल्यानंतर ग्रामदैवत राजा हनुमान मंदिराच्या पारावर जावायास मनपसंत कपड्याचा आहेर देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मागच्या दोन दिवसांपासून इकडे-तिकडे शोध घेऊन धुलीवंधनाच्या दिवशी सकाळी विड्यातील तरुणांनी मानाच्या जावायास सिंधी येथे मोठ्या शिताफीने पकडले.

सोमवारी सकाळी गावातून परंपरेप्रमाणे वाजत-गाजत डिजेच्या संगीताच्या तालावर रंगाची उधळण करत नाचत मिरवणूक पार पडली. त्यानंतर ग्रामदैवत राजा हनुमान मंदिराच्या पारावर जावाई संतोष जाधव यांना ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुरज पटाईत, समिरसिंह देशमुख, बाबासाहेब पटाईत, बळीराम देशमुख व कैलास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपसंत कपड्याचा आहेर केला.

गावभरं काढण्यात आलेल्या मिरवणूकीत तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते. मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला-पुरूष, लहान मुलांनी गातील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. तर हा आगळावेगळा गदर्भ स्वारीचा मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूरसह दूरदूरच्या गावातून अनेकजण विड्यात दाखल झाले होते.

मिरवणूक पार पडल्यानंतर सकाळपासून माणसांच्या गर्दीने ओसंडून गेलेले गावातील रस्ते सर्वजण आप-आपल्या कामात गुंतल्याने मिरवणूकी दरम्याण गर्दीने गजबजलेलं गाव ओस पडल्याचे दिसत होते. त्यामुळे मोठ्या आनंदोत्सवानंतर गावं कसं शांत-शांत झाल्याचा भास होत-होत होता.

गदर्भ स्वारीचा मानकरी जावई शोधण्यासाठी यावर्षी विडेकरांची झाली दमछाक-

धुलीवंदनाच्या दोन दिवसांपूर्वी सकाळी पकडलेला अशोक भोसले हा जावाई मेडीसिनचा बहाणा करून दुपारी पळून गेला. त्यानंतर सिंधी येथील संतोष रामभाऊ जाधव या जावयाला पकडण्यात यश आले. त्यांच्या मिरवणूकीनंतरच्या आहेरासाठी सोन्याची अंगठी व ड्रेसचा बेत घेतल्याने सर्वजण बेसावध असल्याचा फायदा घेऊन जेवणाचा पाहुणचार करण्याच्या घाईगडबडीत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोही पळून गेला.

त्यामुळे विडेकरांच्या समोर प्रश्न उपस्थित झाला की उद्याच्या गदर्भ स्वारीचा मानकरी जावाई रात्रीत कसा शोधावा? मात्र नव्वद वर्षांपासूनच्या परंपरेला खंड पडल्यास काय? मग ते कसले विडेकर! नाउमेद न होता रात्रीतूनच जावाई पकडून आणण्यासाठी तरूणांची दोन पथकं रवाना झाली. एक केज शहरात तर दुसरे पळून गेलेल्या 'सिंधी'च्या जावयाच्या शोधात. अखेर पळून गेलेल्या संतोष जाधव या जावायालाच सोमवारी सकाळीच ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com