Beed News : टंचाईच्या झळांमध्ये अवकाळीच्या कळा

वरुणराजाने डोळे वटारल्याने गत हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असतानाच लोकसभा निवडणुकीची राजकीय गरमीही वाढली आहे.
Beed News
Beed Newssakal

वरुणराजाने डोळे वटारल्याने गत हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असतानाच लोकसभा निवडणुकीची राजकीय गरमीही वाढली आहे. दुसरीकडे पुन्हा निसर्ग कोपला असून, जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसत आहे.

- दत्ता देशमुख

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ७४ टक्के पाऊस झाला. नद्या-नाल्यांना पाणी वाहणारा पाऊसच झाला नाही. परिणामी आता जलस्रोतांमध्ये केवळ साडेपाच टक्के उपयुक्त साठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे चांगलीच होरपळ सुरू झाली आहे. सध्या दोनशे गावे पाणीटंचाईने त्रस्त असून, सुमारे अडीशे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठीही सध्या ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात चार लाखांवर लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर आहे. बीडसारख्या ठिकाणी पाणी असूनही प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा फटका बसत आहे. पाण्यासाठी २० दिवसांचा खंड शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. टंचाईच्या झळा आणखी दोन ते अडीच महिने जाणवणार आहेत. किंबहुना त्या अधिक तीव्र होत जाणार आहेत.

Beed News
Sambhaji Nagar : ऐन उन्हाळ्यात शहरावर नवे संकट ; नवी पाइपलाइन धुण्यासाठी लागणार ५० लाख लिटर पाणी

पावसाअभावी खरीप पिकांच्या नुकसानीच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता जनावरांसाठी चारा-पाण्याची चिंता आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. टंचाई उपाययोजना आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, अशी दुहेरी कसरत प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यात उन्हाचा कहर असून, तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हामुळे बाजारपेठा ओस असल्या, तरी राजकीय मैदाने मात्र गर्दीने फुलत आहेत.

निसर्ग पुन्हा कोपला

दुष्काळी झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा निसर्ग कोपला आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात जोरदार वारे, विजांच्या कडाकडाट, अवकाळी पाऊस, गारपिटीचा चार हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. वीज पडून व गोठे पडून ३० जनावरे दगावली आहेत. अगोदरच सिंचनाची कुठलीही साधने नाहीत आणि कायम दुष्काळ असणाऱ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या पावणेदोन हजार हेक्टरवरील बागायती पिके व फळबागांचा सुपडा साफ झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असताना राज्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत.

धार्मिक उपक्रमांची पर्वणी

टंचाईचे चटके सहन करत असलेले बीड जिल्हावासीय सध्या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांत दंग आहेत. श्रीरामनवमीचा उत्सव जिल्हाभरात उत्साहात साजरा झाला. गावोगावी हरिनाम सप्ताह व यात्रोत्सव होत आहेत. परिसरातील श्रीक्षेत्र नारायणगडाचा फिरता नारळी सप्तात दोन दिवसांनी सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे सुरू होत आहे. यासाठी तब्बल ५१ एकरांवर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. विडा (ता. केज) येथे मध्ययुगीन कालखंडातील समाजव्यवस्थेचे चित्रण मांडणारे व राज्यात मोजक्या ठिकाणी सादर होणारे पारंपरिक लळीत नाट्य पुढच्या आठवड्यात असून, त्याची रंगीत तालीम सुरू आहे.

हाय व्होल्टेज निवडणूक

लोकसभेच्या बीड मतदरासंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी वगळून पंकजा मुंडेंना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे रिंगणात उतरले आहेत. शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांनीही राज्याच्या सहकार विभागाच्या अपर सहनिबंधकपदाचा राजीनामा देऊन भेटीगाठींचे सत्र सुरू केले आहे. त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. या मतदरासंघातील निवडणूक हाय व्होल्टेज मानली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com