परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिकांचे नुकसान 

गणेश पांडे 
Friday, 19 February 2021

गेल्या दोन दिवसातील या अवकाळी पावसाने परभणी जिल्ह्यात आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला. तसेच गहू व अन्य पिकांनाही तडाखा बसला. 

परभणी ः शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१९) पहाटेपासून सकाळपर्यंत विजांच्या कटकडाटासह रिमझिम असा पाऊस झाला. तसेच दिवसभर ढगाळ असे वातावरण पसरले होते. हवेत कमालीचा गारवा होता.

पावसाने काही भागांना झोडपले
बुधवारी रात्री जिल्ह्यात अवकाळी पावसाने काही भागांना झोडपून काढले. विशेषतः पाथरी तालुक्यात लिंबा तसेच परभणी तालुक्यात सिंगणापूर भागात गारांच्या पावसाने तडाखा दिला. अन्यत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. गुरुवारी (ता.१८) दिवसभर वातावरण स्वच्छ होते, परंतू, सायंकाळपासून हवेत गारवा पसरला. रात्री काही थेंबे पडली. परंतु, शुक्रवारी (ता.१९) पहाटे तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरु होता. सकाळी सात वाजेपर्यंत ९.६ मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली. दरम्यान शुक्रवारी तापमानही १६ अंश सेल्सिअस एवढे होते. गुरुवारी १.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सांयकाळपर्यंत सर्वदूर ढगाळ वातावरण होते. गेल्या दोन दिवसातील या अवकाळी पावसाने आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला. तसेच गहू व अन्य पिकांनाही तडाखा बसला. दरम्यान, पुढील दोन दिवसही असेच वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सेलूत रब्बी पिकांचे नुकसान 
सेलू ः तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामूळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. तालूक्यात गुरूवारी (ता.१८) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह शुक्रवारी (ता.१९) रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. या अवकाळी पावसामूळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरासह फळबाग व भाजीपाला पिकांचे आतोनात नुकसान झाले. काढणीला आलेले ज्वारी, गहू व हरभरा पिके जमिनदोस्त झाली आहेत. 

गंगाखेड शहरासह तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित 
गंगाखेड : शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसह तालुक्यातील विद्युत पुरवठा शुक्रवारी (ता.१९) पहाटे खंडित झाला. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले. तसेच रात्री दोन वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. यामुळे शेतकऱ्यासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

एरंडेश्वर परिसरात गव्हाचे पिक आडवे 
एरंडेश्वरः पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरामध्ये शुक्रवारी (ता.१९) दुपारी १२ वाजेपर्यंत पाऊस सतत चालू राहिल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील गव्हाचे पिक पूर्णपणे आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एरंडेश्वर परिसरातील पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी एरंडेश्वर परिसरातील शेतकरी करीत आहेत. 

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मोठी बातमी

झरी परिसरात पावसाचा तडाखा 
झरी व परिसरात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. शुक्रवारी पहाटे देखील सकाळी नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. झरी, टाकळी बोबडे, टाकळी या भागात जोरदार पाऊस झाला. सलग तीन तास रिमझिम स्वरुपात पाऊस झाल्याने गह, ज्वारी हे पिके आडवी झाली तसेच कापणी सुरू असलेल्या हरभरा पिकाला देखील फटका बसला. 

हेही वाचा - आमदाराचा नाद करायचा नाय !!

जिंतूर तालुक्यात रिमझिम, हलका पाऊस 
जिंतूर : तालुक्यात शुक्रवारी (ता.१९) रिमझिम व हलका पाऊस झाला. काही भागात जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतरही ढगाळी वातावरण असल्याने सायंकाळपर्यंत तालुक्याला सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे पिकांचे बरेच नुकसान झाले. अंबरवाडी, येलदरी, सावळी, आडगाव या भागात जोराचे वारे वाहू लागले. सध्या तालुक्यात बहुतेक ठिकाणी रब्बी ज्वारी, हरभरा, गहु काढणीला आली आहेत. परंतू, वारा, पाऊस यामुळे ऊभी पिके झाली असून पावसाने भिजून खराब झाली. गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. तो दुसरे दिवशी संध्याकाळी सुरळीत झाला. सुमारे अठरा तासाच्या वीजपुरवठ्याच्या खंडागळे विद्युत उपकरणे बंद पडल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. 
 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untimely strike in Parbhani district, crop damage parbhani news