‘यूपीएससी’च्या निकालात बीडची बाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

बीड - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे. सात जणांनी यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविले असून यातील दोघांची आयएएससाठी (भारतीय प्रशासन सेवा) निवड शक्‍य असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

बीड - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे. सात जणांनी यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविले असून यातील दोघांची आयएएससाठी (भारतीय प्रशासन सेवा) निवड शक्‍य असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

शुक्रवारी (ता. २७) जाहीर झालेल्या निकालात डॉ. सुयश यशवंत चव्हाण (रॅंक ५६) व अभियंता मयूर अशोक काथवटे (रॅंक ९६) या दोघांना भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) मिळणे शक्‍य असल्याचे प्रा. एस. जी. राऊत यांनी सांगितले. तर, प्रणव प्रकाश नहार (रॅंक १९९), डॉ. किशोर रामचंद्र धस (रॅंक ७११), अभियंता रोहित माणिकराव गुट्टे (रॅंक ७३४), रामेश्वर घोडके (रॅंक ७४५), प्रदीप सोनवणे (रॅंक ८९९) यांनीही यश मिळविले असून, त्यांना आयआरएस (भारतीय महसूल सेवा) किंवा तत्सम मिळणे शक्‍य आहे.

या निकालात डॉ. सुयश चव्हाण व अभियंता मयूर काथवटे यांनी पहिल्या शंभरमध्ये येण्याचा मान मिळविला आहे. यातील डॉ. सुयश वैद्यकशास्त्राचे पदवीधर (एमबीबीएस) तर मयूर हे मुंबईच्या आयटीमधून बी.टेक. आहेत. अंबाजोगाई येथील रामेश्वर घोडके याने ७४५ वी रॅंक मिळविली. तर, केज तालुक्‍यातील सारणी सांगवी येथील डॉ. किशोर धस याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. तोही वैद्यकशास्त्राचा (एमबीबीएस) पदवीधर आहे. अभियंता व राज्यशास्त्रातून फेलोशिप मिळविलेल्या रोहित गुट्टेनेही यश मिळविले आहे. 

अभियंता असलेल्या प्रदीप विष्णू सोनवणे यानेही यशाचा झेंडा फडकावीत ८९९ रॅंक प्राप्त केली. विशेष म्हणजे त्याने कसलीही शिकवणी लावली नाही.

अधिकाऱ्यांचा जिल्हा अशी होतेय आता बीडची ओळख
बीड - ऊसतोड मजूर पुरविणारा जिल्हा, उद्योग नाहीत अशा कारणांनी मागास जिल्ह्याला मागच्या काळात मुलींचा घटलेला जन्मदर आणि स्त्रीभ्रूण हत्या अशा बदनामींच्या प्रकारांचाही सामना करावा लागला. भांडणे, स्त्री अत्याचारांच्या घटनांनीही नाव बदनाम होत असतानाच आता जिल्ह्याला अधिकाऱ्यांचा जिल्हा अशी नवी ओळख तयार होत आहे. अगोदर राज्यभरात उच्चपदस्थ अधिकारी दिलेल्या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना शुक्रवारच्या (ता. २७) यूपीएससीच्या निकालाने आणखीच प्रेरणा मिळाली आहे. निकालात जिल्ह्यातील सात जण यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत.

अलीकडच्या काळात जिल्ह्यातील युवकांचा स्पर्धा परीक्षांकडे कल अधिक वाढला आहे. अलीकडच्या काळातील राज्य लोकसेवा आयोग असो वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांत जिल्ह्याचा नेहमीच डंका असतो. म्हणून नव्या पिढीला प्रेरणा मिळून मुले स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. बेलंबा (ता. परळी) येथील किरण गित्ते (महानगर आयुक्त पीएमआरडीए) तर, ताडसोन्ना (ता. बीड) येथील तुकाराम मुंडे (नाशिकचे मनपा आयुक्त) बड्या हुद्द्यावर आहेत. शीतल उगले (आयएएस), डॉ. विजय राठोड (आयएएस), विपुल सुस्कर (आयआरएस), विवेक  भस्मे (आयएएस), केदार चंद्रकांत (आयआरएस), सुदर्शन लोढा (आयआरएस), गणेश तांदळे (आयआरएस), जाधव रूपेश (आयईएस) यांनीही यशाची परंपरा राखलेली आहे. 

आता सात जणांनी यूपीएससीत यश मिळविले असून, त्यापैकी दोघांची आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) साठी निवड शक्‍य आहे. उर्वरित उमेदवारही तत्सम बड्या हुद्द्यावर जातील. विशेष म्हणजे, यश मिळविणारे सर्वच सधन कुटुंबातील असले तरी त्यांच्या यशाचे गमक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. यातील अनेकांनी वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, तर कोणी आयटीमधील अभियांत्रिकी केलेली असल्याने त्यांना कुठेही लाखभर पगार शक्‍य होता. मात्र, सामान्यांची सेवा आणि आव्हानात्मक कामासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा निवडलेला मार्गही उमेदवारांना प्रेरणादायी आहे.

अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या निकालात बीडचा झेंडा फडकत आहे. नव्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना या यशामुळे प्रेरणा मिळत असल्याचे वाढत्या संख्येवरून दिसते. दरवर्षी साधारण दोघांची जिल्ह्यातून आयएएससाठी निवड होते, ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी आहे. 
- प्रा. एस. जी. राऊत, सनीज क्‍लासेस बीड.

Web Title: UPSC Result Success