मराठवाड्यात करावा कृत्रिम पावसाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी मराठवड्यात अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ढग आहेत पण पाऊस नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, खरिपाची पेरणी रखडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लातूर - पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी मराठवड्यात अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ढग आहेत पण पाऊस नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, खरिपाची पेरणी रखडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळाचे चटके अजूनही कायम असून, ते दूर करण्यासाठी शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी काँग्रेसचे सचिव, आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र विशेषत: मराठवाड्यातील जनता दुष्काळाने त्रस्त झाली आहे. पावसाळा सुरू होऊन ४५ दिवस उलटून गेले तरी अद्याप पेरणीयोग्यही पाऊस झालेला नाही. पाणी, चाऱ्याची तीव्र टंचाई कायम आहे. या स्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला तर तो यशस्वी होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of artificial rain in Marathwada