कार्ड वापरताय? सावधान! 

प्रकाश बनकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : तुम्ही बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताय?... तर सावधान! कारण तुमच्या कार्डचे क्‍लोनिंग तर होत नाही ना, याची काळजी घ्या. कारण डेबिट कार्ड फिजर स्कीमर मशीनच्या माध्यमातून क्‍लोनिंग करून पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर आले आहेत. 

औरंगाबाद : तुम्ही बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताय?... तर सावधान! कारण तुमच्या कार्डचे क्‍लोनिंग तर होत नाही ना, याची काळजी घ्या. कारण डेबिट कार्ड फिजर स्कीमर मशीनच्या माध्यमातून क्‍लोनिंग करून पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर आले आहेत. 

ठाणे शहरातील तीनहात नाका परिसरातील पेट्रोलपंपावर 22  ऑगस्ट असाच प्रकार घडला. कार्ड क्‍लोनिंग करून एकाचे चाळीस हजार रुपये हडपण्यात आले असून, पोलिसांनी संशयिताला पकडले आहे. असेच प्रकार राज्यात अनेक ठिकाणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातही असे प्रकार होत आहेत का, याचीही पोलिसांतर्फे चाचपणी केली जात आहे. 

असे होते क्‍लोनिंग - 
कार्ड स्वाइप करताना तुमचे लक्ष विचलित करून मोबाईलमध्ये असलेल्या "स्कीमिंग'मध्ये तुमचे कार्ड स्वॉईप केले जाते. त्यातून स्कीमिंग गॅझेटमध्ये तुमच्या कार्डची सर्व माहिती कॉपी होते. त्यानंतर ते गॅझेट संगणकाला जोडून त्यातील माहिती संगणकात टाकण्यात येते. स्कीमिंग डिव्हाईस सॉफ्टवेअर माध्यमातून ब्लॅंक डेबिट कार्डवर कॉपी करून ते डेबिट कार्ड तयार केले जाते. त्यानंतर त्या कार्डच्या माध्यमातून रात्री पावणेबारा वाजता आणि बारानंतर पैसे काढले जातात. कारण रात्री अकरानंतर बहुतांश व्यक्ती मेसेज पाहत नाहीत. ठाण्यात झालेला प्रकार याच पद्धतीचा होता. 

अशी बाळगा सावधगिरी... 
-क्रेडिट आणि डेबिट कार्ड दुसऱ्याच्या हातात देऊ नका. 
स्वत: समोर असतानाच स्वाइप करा. 
-पिन टाइप करताना तो दुसऱ्यांना दिसणार नाही, याची काळजी घ्या. 
-स्वाइपच्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्यामुळे तुमचा पिन क्रमांक दिसू शकतो.

खिशातही कार्ड सुरक्षित नाही 
स्कीमिंगच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती चोरून पैसे काढल्याच्या घटना नवीन नाहीत; पण याहीपेक्षा चोरीचा दुसरा हायटेक प्रकार म्हणजे पिक पॉकेटिंगचा आहे. हॅकर्स आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या खिशातील डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवून पैसे काढतात. हे ऍप्लिकेशन ब्लूटूथच्या रेडिएशनप्रमाणे काम करते. ते पाच ते दहा फूट परिसरातील लोकांच्या खिशातील डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या मॅग्नेटिक स्ट्रीपची माहिती कॅप्चर करते. हे प्रकार टाळता येतात. यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन त्या रेडियसला ब्लॉक करतो. ही प्रणाली असलेले जॅकेट आणि पॉकेटचा वापर करावा. 

"चोरटेही आता हायटेक झालेले आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्डवरून स्वाइप करताना सावधगिरी बाळगावी. पिन टाइप करताना काळजी घ्यावी.'' 
- तन्मय दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ, नाशिक.

Web Title: using card then be careful