सात महिलांवर विशीतच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया - डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

अगदी कमी वयात महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकण्याचे प्रकार घडल्याचे या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या प्रमुख आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर उघड झाले.

बीड - अगदी कमी वयात महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकण्याचे प्रकार घडल्याचे या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या प्रमुख आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर उघड झाले.

यामध्ये ठराविक रुग्णालयांचा उल्लेख झाल्याने त्याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. इनकॅमेरा केलेल्या चौकशीत सात महिलांवर वयाच्या विशीतच गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्याचे समोर आल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय चारसदस्यीय समितीने गर्भपिशवी शस्त्रक्रिया प्रकरणाच्या चौकशी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सदर शस्त्रक्रियामुळे पीडित असलेल्या जिल्ह्यातील 60 ते 70 महिलांची बुधवारी इनकॅमेरा चौकशी केली. डॉ. गोऱ्हे यांनी याप्रकरणी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ऊसतोडणी मजुरांचे प्रतिनिधी, खासगी डॉक्‍टर संघटनांचे प्रतिनिधी, मुकादम व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. दरम्यान, 50 ते 60 महिलांपैकी सात महिलांनी त्यांची शस्त्रक्रिया वयाच्या 20, 22, आणि 25 वर्षी झाल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेनंतरदेखील पोट दुखणे अथवा विविध शारीरिक आणि आरोग्यविषयक तक्रारींचा त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या दरम्यान, काही ठराविक रुग्णालयांतच शस्त्रक्रिया झाल्याचा उल्लेख झाला आहे.

दहा ऑगस्टपर्यंत अहवाल देणार
जिल्ह्यातील गर्भाशय शस्त्रक्रियाप्रकरणी आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. जिल्ह्यातील अशा महिलांशी संवाद साधून आज माहिती घेण्यात आली आहे. या सर्व बाबींचा अहवाल तयार करून 10 ऑगस्टपर्यंत सादर करण्यात येईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uterus surgery for seven women dr Neelam Gorhe