esakal | जिंतूर तालुक्यात लसीकरण थांबले : सरकारच्या घोषणेचा फज्जा

बोलून बातमी शोधा

Corona special vaccination
जिंतूर तालुक्यात लसीकरण थांबले : सरकारच्या घोषणेचा फज्जा
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर (परभणी) : शासनाने मोठा गाजावाजा करून एक मेपासून १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे हजारो तरुणांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली, परंतु शहरातील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे सकाळपासून लस घेण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिक, तरुणांना परत यावे लागले.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनातर्फे कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस देण्याचे ठरले. त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लस घेण्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रात दररोज शेकडो नागरिकानी रांगा लावल्या होत्या. परंतु मध्येच लसीचा तुटवडा निर्माण होऊ लागल्यामुळे अनेक नागरिकांना लस न मिळाल्याने हात हलवत परत जावे लागत असून आठवड्यातील काही दिवस तर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रच बंद पडते.

अशातच केंद्र सरकारने घोषणा केली की एक मे पासून १८ वर्षावरील सर्व युवा नागरिकांना लस देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र नोंदणी ॲप देखील जाहीर करण्यात आले. त्यानुसार २८ एप्रिलपासून हजारो तरुणांनी लस मिळवण्यासाठी नोंदणी केली, परंतु तालुक्यातील एकालाही लसीकरणाची वेळ, दिनांक व लसीकरणाचे ठिकाण मिळाले नाही. तरीही अनेकजण एक मे रोजी ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी गेले असता त्यांना लस उपलब्ध नसल्याचे समजले. तसेच तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा उप केंद्रामधूनही लसीकरण करण्यात आले नाही.

हेही वाचा: जिंतूर-जालना रोडवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

शासनाने जाहीर केले पण आदेश प्राप्त नाही

शासनाने एक मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले असले तरीही अद्यापपर्यंत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला तसे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही अथवा काही उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण होऊ शकले नाही. मात्र तालुक्यातील कोक व कोठा या दोन ठिकाणी लस शिल्लक असल्याने तेथे लसीकरण सुरू आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांनी सांगितले.

लस नसल्यामुळे लसीकरण बंद

४५ वर्षा पुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यासाठी शनिवारी (एक मे) लस न मिळाल्याने लसीकरण केंद्र बंद पडले. तेव्हा १८ वर्षावरील तरुणांना देण्यासाठी लस कोठून आणणार? असा सवाल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी केला. हजार लसीची मागणी नोंदवल्यानंतर फक्त २०० लस मिळत असल्याने लसीकरणाचे काम थांबवावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

१९५०९ नागरिकांचे लसीकरण

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आतापर्यंत ६९०४ पुरुष व ६२८६ महिला असे एकूण १३१९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांनी दिली तर शहरातील ग्रामीण रुग्णालयात २९,९४2 महिला आणि ३८२५ पुरुष याप्रमाणे एकूण ६३१९ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी दिली. यावरून शहरासह तालुक्यातील एकूण १९,५०९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.