Breaking : दहा लाखांची लाच घेताना वैद्यनाथ बँकेचा अध्यक्ष अशोक जैन जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

बँकेच्या व्यापारी सभासदाला अडीच कोटी रुपयांचे सीसी (कॅश क्रेडीट) कर्ज मंजूर केल्यावरुन १५ लाख रुपयांची मागणी करुन दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष अशोक जैन यास सोमवारी (ता.१९) परळी येथील राहत्या घरी अटक करण्यात आली.

बीड : बँकेच्या व्यापारी सभासदाला अडीच कोटी रुपयांचे सीसी (कॅश क्रेडीट) कर्ज मंजूर केल्यावरुन १५ लाख रुपयांची मागणी करुन दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष अशोक जैन यास सोमवारी (ता.१९) परळी येथील राहत्या घरी अटक करण्यात आली.

औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.जिल्ह्यातील प्रमुख नागरी सहकारी बँकांपैकी परळी येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँक ओळखली जाते. या बँकेच्या एका कळंब येथील सभासद व्यापाऱ्याला २०१८ मध्ये अडीच कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी बँकेचा अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याने १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ता.२९ सप्टेंबरला लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीची औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा उस्मानाबाद दौरा रद्द, बुधवारी अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी

त्यातील दहा लाख रुपये सोमवारी व नंतर उर्वरित पाच लाच रुपये स्विकारण्याचे ठरले. त्यावरुन पथकाने सोमवारी अशोक जैन याच्या राहत्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना अशोक जैन यास पकडले. एखाद्या प्रतिथयश बँकेच्या अध्यक्षाला लाच घेताना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे या बँकेच्या संचालक आहेत. पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलिस नायक विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, विलास चव्हाण, चागंदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaidyanath Bank Chairman Ashok Jain Trapped For Taking Bribe Beed News