‘भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी’

शशिकांत धानोरकर
बुधवार, 8 एप्रिल 2020


लॉकडाउन व संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेणे मुश्कील झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाने ‘भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी’ हा उपक्रमाला राबवत शेतकरी व ग्राहकांना दिलासा दिला आहे.

तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः लॉकडाउन काळात भाजीपाला विक्री व खरेदीबाबत संकटात असलेल्या शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी कृषी विभागाने ‘भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी’ उपक्रम तामसा येथे सुरू केला आहे. कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंधरवड्यापासून शासनाने लोकडॉउन, संचारबंदी चालू केली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी कमालीचे अडचणीत आले असून भाजीपाला खरेदी करण्याबाबत सर्वसामान्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेतातील भाजीपाला विकणे अवघड झाले असून दिवसागणिक तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

 

हेही वाचा -  प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी

ग्राहकांना दिलासा

लॉकडाउन व संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेणे मुश्कील झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाने ‘भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी’ हा उपक्रमाला राबवत शेतकरी व ग्राहकांना दिलासा दिला आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाकडून वाहन परवाना व तत्सम तांत्रिक बाबी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांनी शासनाच्या ‘आत्मा’ संस्थेचे सहकारी मिळवत हा उपक्रम शेतकऱ्याच्या माध्यमातून चालू केला आहे. 

गावांमध्ये भाजीपाला घरोघरी विकत आहेत

यामुळे शेतकरी खासगी वाहन घेऊन मोठ्या गावांमध्ये भाजीपाला घरोघरी विकत आहेत. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होऊन त्यांना ताजा भाजीपाला थेट घरी मिळत आहे. तामसा येथे बुधवारी (ता. आठ) लोहा (ता. हादगाव) येथील भाजीपाला विक्रेते शेतकरी प्रशांत शिंदे यांनी या उपक्रमाची सुरवात केली. ग्राहकांनी या उपक्रमाचे स्वागत करून ताजा भाजीपाला घरपोच मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या बाबत बोलताना भाजीपाला विक्रेते प्रशांत शिंदे म्हणाले, या उपक्रमामुळे शेतातील भाजीपाला विकण्याची चिंता कमी होत आहे. पण विक्रीसाठीचा कालावधी हा केवळ तीन तासांचा असून भाजीपाला वाहतूक करण्यासाठी खासगी वाहन वापरावे लागते. आज तामसा येथे अंदाजे सहाशे रुपयांचा भाजीपाला विकला. पण खासगी वाहनासाठी पाचशे रुपये मोजावे लागले. परवानाधारक शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी कालावधी वाढून मिळणे आवश्यक आहे. अन्यथा ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असेच दुर्देवी चित्र समोर येईल. याचा विचार होणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Vegetable direct customers' door', nanded news