बाजार मांडला रस्त्यावरच!

प्रकाश बनकर
रविवार, 8 डिसेंबर 2019

जार समितीत शेतकऱ्यांसाठी ओटे बनविण्यात आले आहेत. तसेच किरकोळ आणि ठोक विक्रेत्यांसाठी सुविधा दिल्या आहेत. त्यांचा वापरच ते करीत नाहीत. व्यापारी रस्त्यावर आपला बाजार थाटत आहेत. 

औरंगाबाद : शहरातील महत्त्वाची भाजीमंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीमंडईत समितीतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या सुविधांचा वापर काही तुरळक शेतकरी आणि व्यापारी करताना दिसत आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी ओटे बनविण्यात आले आहेत. तसेच किरकोळ आणि ठोक विक्रेत्यांसाठी सुविधा दिल्या आहेत. त्यांचा वापरच ते करीत नाहीत. व्यापारी रस्त्यावर आपला बाजार थाटत आहेत. 

शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने दोन कोटी रुपये खर्चून हरिभाऊ बागडे शेतकरी संकुल हे पत्र्याचे शेड सुरू केले आहे. या शेडमध्ये शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहे. असे असले तरी या संकुलात 40 ते 50 शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करता येईल अशी सुविधा देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ चार ते पाच शेतकरीच याचा लाभ घेत आहेत. इतर शेतकरी आणि शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी बसणारे व्यापारी हे रस्त्यावर येऊन बसतात. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

पार्किंगची सुविधा नाही 
बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या व खरेदीसाठी मंडईत येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र अशी पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. जो ठेकेदार बाजार समितीने नेमला आहे तो बी-बियाणे विक्रेत्यांच्या दुकानासमोर आणि आता थेट बाजार समितीच्या नव्या सिमेंट रोडवर वाहने लावायला सांगतो. त्या वाहनाधारकांकडून केवळ वसुली केली जात आहे. त्यांची सुरक्षितता आणि जबाबदारी हा ठेकेदार घेत नाही. एवढेच नव्हे, तर अनेक वाहनधारकांसोबत या ठेकेदाराच्या माणसांचे भांडणही झाले आहे. पार्किंग चालकांच्या कर्मचाऱ्यांतर्फे काही वाहनधारकांना धमकावल्याच्याही तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. शेतकऱ्यांना पार्किंग माफ असतानाही या ठेकेदाराकडून सक्‍तीने वसुली केली जात आहे. 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार

स्वच्छतेचा अभाव 
भाजीमंडईत शेतमाल घेऊन येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृह आहे; मात्र त्याचा वापर शेतकरी आणि व्यापारी करीत नाहीत. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासह शेतमाल विक्री करण्याच्या ठिकाणी बाजार समितीतर्फे नियमित स्वच्छता केली जात नाही. यामुळे ज्या व्यापाऱ्यांना गाळे दिले आहेत, त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणावर कचरा, घाण या ठिकाणी केली जात आहे. यामुळे शेतकरी, ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेसाठी कुठल्याच उपाययोजना बाजार समितीकडूनही केल्या जात नाहीत. 
आणखी वाचा - 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच प्रकल्पांना स्थगिती'

मोकाट जनावरे 
मंडईत मोकाट जनावरांचा मोठा त्रास शेतकरी, व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. याविषयी शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही बाजार समिती आणि मोकाट जनावरांच्या मालकांतर्फे या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याप्रकरणी आता बाजार समितीत मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याविषयीचे पत्रही बाजार समितीतर्फे सिडको पोलिस ठाण्यात देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable Market in the city on the road!