आराराऽऽऽ भाजीपाला चिखलातूनच खरेदी करा!

औरंगाबाद: शहागंज येथील भाजीमंडईतील विक्रेत्यांना जागा नसल्याने अशा प्रकारे रस्त्यावर बसून भाजीपाला विकावा लागतो. (छायाचित्र ः महोम्मंद इम्रान)
औरंगाबाद: शहागंज येथील भाजीमंडईतील विक्रेत्यांना जागा नसल्याने अशा प्रकारे रस्त्यावर बसून भाजीपाला विकावा लागतो. (छायाचित्र ः महोम्मंद इम्रान)

औरंगाबाद - स्वच्छ, नैसगिकरीत्या पिकविलेला भाजीपाला घेण्याकडे सर्वांचा कल वाढत आहे. मात्र, शहरातील बहुतांश भाजीमंडई, आठवडे बाजारांमध्ये विक्रेत्यांना चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागतो. सुविधांच्या नावाने बोंबच असल्याने बाजारही आता रस्त्यावरच आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

झपाट्याने वाढणाऱ्या शहरात लोकवस्तीतही वाढ होत आहे. यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या भागात नवी भाजीमंडई अथवा आठवडे बाजार सुरू होतो. मात्र, नव्याने उभ्या राहणाऱ्या सोसायटी आणि अपार्टमेंटच्या परिसरात फळभाजीपाला विक्रेत्यांसाठी जागा नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर दुकाने थाटावी लागतात. शहरात जुन्या औरंगपुरा, टीव्ही सेंटर, रेल्वेस्टेशन येथील बाजार समितीत भाजीमंडईसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी औरंगपुरा, टीव्ही सेंटर येथे पालेभाज्या विक्रेत्यांसाठी गाळे देण्यात आले. यासह बाजार समितीत भाजीपाला विक्रेते आणि पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हरिभाऊ बागडे शेतकरी संकुल बांधण्यात आले आहे. मात्र, या संकुलात शेतकरी बसतात. इतर भाजीपाला विक्रेते मार्केटमध्ये जागा उपलब्ध असतानाही ते रस्त्यावर व्यवसाय करतात. इतर भाजीमंडईत सुविधा नाही. त्यांना पुरेशा जागा नसल्यामुळे या विक्रेत्यांना रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे अतिक्रमणे करून व्यवसाय करावा लागत आहे. 
 
शहरातील भाजीमंडईंवर एक नजर बाजार समिती 
बाजार समितीत शेतकरी आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी बाजार ओटे बांधण्यात आले; मात्र या ओट्यांचा वापर अनेक वर्षांपासून होत नव्हता. यामुळे बाजार समिती प्रशासनाने या ओट्यांवर प्री-कोटेड पत्र्याचे शेड बसविले. या शेडमध्ये शंभराहून अधिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सुविधा करण्यात आली आहे. याचा वापर काही शेतकरी करीत आहेत; मात्र विक्रेत्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही काहीजण रस्त्यावर दुकान मांडतात. पावसाळ्यात दिलेल्या जागेचा वापर करणे सोडून हे छोटे विक्रेते रस्त्यावर दुकान मांडून चिखलात माखलेला भाजीपाला ग्राहकांना विकत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
मुकुंदवाडी : मुकुंदवाडीतील भाजीमंडईत अनेक विक्रेते रस्त्यावर बसतात. यामुळे सकाळी आणि सायंकाळी मुकुंदवाडी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कोंडीत चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने रस्त्यावर बसणाऱ्या पालेभाजी विक्रेत्यांसाठी 130 गाळे दिले आहेत. असे असतानाही काही विक्रेते रस्त्यावर दुकान मांडतात. याच रस्त्यावर चिखलात आपला माल ठेवतात. त्यावरच येणाऱ्या-जाणाऱ्यांची पावले पडतात. मोकाट जनावरांचा प्रश्‍न असून पार्किंगही याच ठिकाणी केली जाते. महापालिका कारवाई करते. कारवाईच्या काही
दिवसानंतर पुन्हा रस्त्यावर ही मंडई सुरू होते. 
 
औरंगपुरा, टीव्ही सेंटर : जुन्या शहरातील या प्रमुख भाजीमंडई आहेत. त्याही रस्त्यावर भरत होत्या. मात्र, महापालिकेतर्फे त्यांना हक्‍काची जागा दिल्यामुळे रस्त्यावर थांबणारे लोक आता शेडमध्ये थांबतात. येथे सुविधा आहे. अशीच सुविधा टीव्ही सेंटर येथील भाजीमंडईमध्येही आहे. 
 
शहागंज : शहागंज येथील भाजीमंडईची मोठी दुरवस्था आहे. तेथील मंडईत जागा नसल्याने रस्त्यावर आपले दुकान थाटावे लागते. पावसाळ्यात ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. चिखल आणि सांडपाण्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते दुकाने लावतात. नागरिकांनाही नाइलाजाने हाच भाजीपाला खरेदी करावा लागतो.  

शिवाजीनगर  : शिवाजीनगरात रस्त्यावर असलेली भाजीमंडई आता बाजूला घेण्यात आली आहे. मात्र, येथेही विक्रेत्यांना सुविधा देण्याची मागणी होत आहे.  

जयभवानीनगर : जयभवानीनगरात भाजीमंडई नाही. यामुळे भाजी विक्रेते चौकात आपली दुकाने थाटतात. त्यामुळे रस्त्यावरचा चिखल भाज्यांवर उडतो. येथे स्वतंत्र भाजीमंडई सुरू करण्याची मागणी होत
आहे. 
 
पुंडलिकनगर रस्ता : गजानन महाराज मंदिर चौकात पालेभाजी व फळे विक्रेते अनेक वर्षांपासून रस्त्यावर व्यवसाय करीत आहेत. या लोकांसाठी एका सोसायटीची मोकळी जागा दिली आहे. असे असतानाही यातील काही लोक अजूनही रस्त्यावर दुकाने मांडत आहेत. 

ओऍसिस चौक, पंढरपूर : औरंगाबाद-नगर रोडवरील ओऍसिस चौकात रस्त्यावर ही भाजीमंडई आहे. यात काही विक्रेत्यांकडे गाळे आहेत. तर काहींनी अतिक्रमणे करून दुकाने थाटली आहेत. या भाजीमंडईमुळे चौकात अनेक अपघातही घडले आहेत. पावसाळ्यात या चौकात मोठी दुरवस्था होते. 

पीरबाजार : येथे नियमित भाजीपाला विक्रेते बसतात. मंडईत व्यापाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी सुविधा नसल्याने मिळेल तेथे भाजीपाला विक्री केला जातो. 

येथे भरतो आठवडे बाजार : चिकठलाणा, जुना मोंढा, छावणी, पीरबाजार आणि वाळूज येथे आठवडे बाजार भरतो. येथेही  सुविधांची कमतरताच जाणवते. पणन मंडळातर्फे सर्व सुविधांनीयुक्‍त तीन आठवडे बाजार भरविण्यात येतात. तेथे फारशा तक्रारी नाहीत. 

भाजीमंडई कोणत्या सुविधेची आहे गरज?
मुकुंदवाडी नव्याने आलेल्या विक्रेत्यांना हवेत गाळे 
औरंगपुरा बीओटीचे काम पूर्ण करावेत, मंडईत चांगले रस्ते हवेत 
टीव्ही सेंटर जुन्या गाळ्यांची दुरवस्था झाली, मार्केट नवीन ठिकाणी हवे 
शहागंज चिखलात भरणाऱ्या या भाजीमंडईला स्वतंत्र जागेची मागणी 
शिवाजीनगर विक्रेत्यांसाठी स्वतंत्र गाळ्यांची गरज 
जयभवानीनगर स्वतंत्र भाजीमंडई उभी करण्याची गरज 
पुंडलिकनगर रस्ता अपार्टमेंटच्या जागेचा वाद मिटवीत हक्‍काची जागा हवी 
ओऍसिस चौक,पंढरपूर स्वतंत्र भाजीमंडईची गरज 
पीरबाजार नव्या विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. 
   

 
 


 
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्री-कोटेड शेड उभारले आहेत. त्यामुळे 24 तास मंडई सुरू राहील, अशी सुविधा बाजार समितीत देण्यात आली आहे. मात्र, बहुतांश शेतकरी याचा लाभच घेत नाहीत. व्यापाऱ्यांसाठी मंडईत सुविधा देण्यात आली आहे. असे असतानाही हे व्यापारी रस्त्यावर दुकाने मांडून वाहतूक कोंडी करतात. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाही व्यापारी नियम पाळत नाहीत. अशांवर आम्ही दंडात्मक कारवाई करीत असतो. 
- राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com