दुचाकीवर आले अन्‌ पाच वाहने फोडून गेले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

औरंगाबाद - दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महानुभाव आश्रम चौकातून रेल्वेस्थानक मार्गे तिघे एका दुचाकीवरून बन्सीलालनगर येथे आले. अंधाराचा फायदा घेत त्यांनी या भागातील रामराव पांडुरंग शहाणे (रा. बन्सीलालनगर, शांतीकुंज बिल्डिंग) यांच्या वाहनाला लक्ष्य केले. वाहनाची नासधूस केल्यानंतर आणखी दोन वाहनांकडे माथेफिरूंनी मोर्चा वळविला. त्या वाहनांची तोडफोड केली. यात वाहनाच्या काचा फुटल्या. दरम्यान, माथेफिरूंनी आणखी दोन वाहनांना लक्ष्य केले. एकूण पाच वाहनांची तोडफोड करून माथेफिरू दुचाकीवर बसून धूत बंगल्याकडून राममंदिराच्या दिशेने निघून गेले, अशी बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पहाटे तोडफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बन्सीलालनगर येथे एकच खळबळ उडाली. नागरिक गोळा झाले. त्यांनी वाहनांची पाहणी करून वेदांतनगर पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेदांतनगर पोलिस ठाण्यात माथेफिरूंविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

घटनेनंतर पोलिस निरीक्षक रामेश्‍वर रोडगे, उपनिरीक्षक एस. बी. डुकरे आणि संदीप शिंदे यांनी पाहणी केली. परिसरातील फुटेज त्यांनी गोळा केले असून एका दुचाकीवर तिघे येऊन तोडफोड करून निघून गेल्याची बाब दिसून आली. 

महापौरांची पाहणी
महापौर नंदकुमार घौडेले यांनी बन्सीलालनगर येथे धाव घेत तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा पुरविण्याची मागणी स्थानिकांनी केली. महापौरांनी परिरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle thodphod in aurangabad