पहावे तिकडे वाहनेच वाहने (वाचा नेमके कुठे)

अनिल जमधडे
शनिवार, 21 डिसेंबर 2019

आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात जिकडे तिकडे चोहीकडे वाहनेच वाहने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. पार्कींगची जागा जप्त वाहनांनी गिळंकृत केल्याने, नागरिकांच्या वाहनांना रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. विशेष म्हणजे, वाहनांच्या गर्दीने परिसरात वावरणेही कठीण झाले आहे. 

आरटीओ कार्यालय परिसरात गेल्या दोन वर्षांपासून वाहने जप्त करुन आणली जात आहेत. जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्यात येत नाही. दोन वर्षापूर्वीचेही अनेक वाहने पडून आहेत. वाढत्या वाहनांमुळे कार्यालयाच्या आवारातील नागरीकांची पार्कींग व्यापून गेली आहे. पार्कींगची जागा संपल्यानंतर जिथे जागा दिसेल तिथे वाहने आणून लावल्या जात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना वाहने बाहेर रस्त्यावर लावावे लागत आहेत. दुचाकीस्वार जिथे जागा दिसेल तिथे वाहने लावत आहे. 

हेही वाचा : कळमनुरीत बंदला हिंसक वळण 

चाचणी ट्रॅक बिघडला 

आरटीओ कार्यालयाच्या आवारात सुस्थितील वाहन चाचणी ट्रॅक आहे. वर्षानुवर्ष याच वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन परवान्यासाठी चाचणी घेतली जात होती. मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी या ट्रॅकवर चाचणी घेणे बंद करुन टाकले आहे. आता वाहन परवान्यासाठीची चाचणी बाहेर रस्त्यावर घेतली जात आहे. वाहन चाचणी बंद केल्याने चाचणी ट्रॅकवर जप्त केलेली अवजड वाहने आणून लावण्यात येत असल्याने चाचणी ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. 

येथे क्‍लिक करा : नांदेडच्या रेल्वे पोलिसात अवतरला हिटलर 

लिलाव होईना 

जप्त केलेल्या वाहनांचे मालक वाहन घेण्यासाठी येत नसतील तर त्यांना नोटीसा देणे आवश्‍यक आहे. नोटीस देऊनही वाहनांचे मालक येत नसतील तर अशा वाहनांचा लिलाव केला पाहिजे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या काळात 2016 मध्ये वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. तेंव्हापासून आजपर्यंत पुन्हा वाहनांचा लिलावच केला जात नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांची गर्दी वाढली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles crowded in the premises of the RTO office