उपसरपंचावर शांतता भंगचा गुन्हा दाखल !

साजीद खान
बुधवार, 25 मार्च 2020


आठवडे बाजार भरविण्याच्या कारणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यामध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली. या वादाचे पर्यावसन झटापटीत होऊन कलम १४४ लागू असताना सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली दोघांवर सिंदखेड पोलिसात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः येथील आठवडे बाजार भरविण्याच्या कारणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यामध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली. या वादाचे पर्यावसन झटापटीत होऊन कलम १४४ लागू असताना सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली दोघांवर सिंदखेड पोलिसात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

भानगड बघण्यासाठी लोकांची गर्दी 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाई बाजार येथील ग्रामपंचायत या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. (ता.१७) मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश असताना दस्तुरखुद्द उपसरपंच यांनीच सकाळच्या सत्रात आठवडे बाजारात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यासाठी प्रवृत्त केले होते. दुपारच्या सुमारास पोलिस येऊन धडकल्यानंतर उपसरपंचांनी घुमजाव करत पोलिसांसोबत फिरून परत दुकाने बंद केली. मंगळवारी (ता.२४) रोजी आठवडे बाजार भरतो का? हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उदय जोगा जाधव (रा. वाई तांडा) चौकात आले असता उपसरपंच उस्मान खान चाँद खान यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. थोड्या वेळातच हमरी-तुमरी होऊन ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींमध्ये झटापट सुरू झाली. प्रचंड लोकांची गर्दीही भानगड बघण्यासाठी जमली होती. 

 

शांतता भंग करण्याचा गुन्हा
राज्यात सध्या १४४ कलम लागू असताना सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या व कायदा आणि सुव्यवस्थेचा आव्हान देऊन संचार बंदीच्या काळात जमाव गोळा करणे इत्यादी आरोपाखाली उपसरपंच उस्मान खान चाँद खान व ग्रामपंचायत सदस्य उदय जोगा जाधव यांच्याविरुद्ध पोलिस हेडकॉन्स्टेबल हेमंत रामराव मडावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (ता.२४) सायंकाळी उशिरा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

आहे.हेही वाचा -  ‘कोरोना’ इफेक्ट : मास्क लावून उभारल्या गुढ्या !

अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर कारवाई
जिल्हाभरात दारू विक्री वर निर्बंध असतानाही मुखेड तालुक्यात दारू विक्री करत असलेल्या एका युवकास दारूच्या बाॅक्ससह ताब्यात घेण्यात आले आहे. तहसिलदार काशीनाथ पाटील, पोलिस निरीक्षक एन.जी. आकुसकर, राज्य उत्पादन शुल्कचे अरविंद जाधव यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या वेळी फौजदार गजानन काळे यांच्या सह तीनही विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहरातील कौठा रस्त्यावरील एका बारच्या समोर मंगळवारी (ता.२४) सायंकाळी चार वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे ईतर ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice-Chancellor complains of peace breach!