विचाराचे प्रदूषण संपविणार - कुलगुरु डॉ. ढवण 

सुषेन जाधव
मंगळवार, 10 जुलै 2018

शास्त्रज्ञांना हेवेदावे संस्थेशी बांधिलकी जोपासत कामाला लागा, असे सांगत विद्यापीठातील विचारांचे प्रदूषण संपविणार असल्याचे डॉ. ढवण यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. 

औरंगाबाद - येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथे बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकालाच संशोधनात रस असतो असे नाही, ती व्यक्ती आजूबाजूचा परिसरही न्याहाळत असते, त्यामुळे हा परिसर घरासारखा स्वच्छ ठेवा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी शास्त्रज्ञांना दिला. तसेच शास्त्रज्ञांना हेवेदावे संस्थेशी बांधिलकी जोपासत कामाला लागा, असे सांगत विद्यापीठातील विचारांचे प्रदूषण संपविणार असल्याचे डॉ. ढवण यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. 
कुलगुरू पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. ढवण यांनी परभणी कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्र विद्यालय, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राला प्रथमच भेट दिली. दरम्यान त्यांनी शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी सहयोगी संचालक डॉ. सु. बा. पवार यांनी डॉ ढवण यांचे स्वागत केले. यावेळी दिप्ती पाटगावकर, डॉ. के. के. झाडे, डॉ. अनिता जिंतूरकर, प्राचार्य डॉ. के. टी. जाधव, डॉ. जी. पी. जगताप, डॉ. एस. आर. जक्कावाड, प्रा. दिनेश लोमटे, सुरेखा कदम, रामेश्‍वर ठोंबरे, आर. सी. सावंत, अरुण सोंजे उपस्थित होते. 

'तो' विश्‍वास सार्थकी ठरविणार -
शेतकऱ्यांचे प्रश्‍न इतर भाषिक कुलगुरुंना समजाताच परंतू शेतकऱ्यांनाही ते मराठीत सांगता यावेत यासाठी मागील काही दिवसापासून शेतकरी, शास्त्रज्ञांची मराठी कुलगुरु होण्याची खूप इच्छा होती. तो विश्‍वास मराठी कुलगुरु म्हणून अधिक तन्मयतेने काम करुन सार्थकी लावणार असल्याचे डॉ. ढवण म्हणाले. माती काम करणाऱ्या मजूराने तर चक्क मी कुलगुरु व्हावे म्हणून महादेवाला अभिषेक करण्याचा नवस केला होता, हे सांगताना आपला अंधश्रद्धेवर विश्‍वास नाही, पण एखाद्याच्या श्रद्धेचा आदर करतो असेही ते म्हणाले. 

अधिकाऱ्यांनो 'संपादकीय' वाचा -
दैनंदिन संशोधन कार्यासोबतच वृत्तपत्रे, नियतकालिकेही वाचा असा सल्ला देत विद्यापीठात मागील 30 वर्षापासून विद्यापीठात काम करताना वृत्तपत्रांतील बातम्याव्यतिरिक्त संपादकीय लेख वाचल्याने अनेक प्रश्‍न जवळून पाहिले. त्यामुळे शास्त्रज्ञांनो तुम्हीही संपादकीय लेख वाचा, अवांतर वाचन करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. 

संस्थेत जर विचारांत हेवेदावे असतील तर बदली केली जाते, मात्र बदली करुन मानवी स्वभाव बदलत नाहीत त्यापेक्षा आपला स्वभाव बदलावा लागतो. आपण ज्या पदावर काम करता त्या पदाला न्याय देण्याचे काम करा. मोठ्या पदावर काम करता आले नाही तरी चालेल मात्र ज्य पदावर काम करता त्या कामाने मोठ्या पदावर काम करणाऱ्यांच्या ह्‌दयात स्थान मिळवा. महत्त्वाचे ही आपल्या बॉसपेक्षा आपण आपल्या सहकाऱ्याच्या नजरेतून उतरेल असे काम करु नका, महिला ही पत्नी, गृहिणी, कार्यालयात अधिकारी म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असते त्यामुळे आपण अधिकारी असो वा नसो त्यांचाही आदर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अगदीच सरळ, साधेपणा जपत कुलगुरुंनी कोणताही प्रोटोकॉल न ठेवता विद्यापीठाच्या प्रक्षेज्ञावर पायी फिरुन पाहणी केली. यावेळी अगदी चालकांचेही ते कौतूक करायला विसरले नाहीत दिला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Vice Chancellor Doctor Ashok Dhavan Gives A Social Message