उस्मानाबाद : सामुहिक अत्याचार पीडित मुलगी देतेय मुत्यूशी झुंज, उपचारासाठी हवेत पैसे

नीलकंठ कांबळे
Thursday, 22 October 2020

लोहारा तालुक्यातील सामुहिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीवर लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील सामुहिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीवर लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. चार दिवस उलटले तरी अद्याप प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत. अद्यापही ती कोमात असून मृत्युशी झुंज देत आहे. पीडित मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अल्ववयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; पीडिता कोमात, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

वडील गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात, तर आई मोलमजुरी करते. एक सात वर्षांची लहान बहीण आहे. त्यांची परिस्थिती गरीब आहे. त्यांच्या मागे कोणाचेही मोठे पाठबळ नाही. त्यामुळेच तीन ते चार नराधमांनी याचा फायदा घेत ता.१८ ऑक्टोबर रोजी दहा वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार केला. पीडिताची प्रकृती खालावल्याने तिला १९ ऑक्टोबर रोजी स्पर्श ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याच दिवशी तिला लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. चार दिवसांपासून उपचार सुरू असले तरी पीडित मुलगी शुद्धीवर आलेली नाही.

शेततळ्यात बुडून मुलीचा मृत्यू, आजीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांसोबत आली होती गावी

अद्यापही ती कोमातचं आहे. मात्र डॉक्टर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. तालुक्यात एवढी मोठी गंभीर घटना घडलेली असताना प्रशासन व पोलिस प्रशासनाने योग्य ती दखल घेतलेली दिसत नाही. सर्व प्रथम 'सकाळ'ने सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींना ताब्यात घेत सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मदतीची आवश्‍यकता
पीडित मुलीची घरची परिस्थिती अत्यंत हालकीची आहे. औषध उपचारालाही त्यांच्याकडे पैशांचा अभाव आहे. अशा स्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी पीडितेच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victim Minor Girl Fight Death Lohara Osmanabad News