Video ; डाळींब विक्रीच्या भावात घसरण, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

राजेश दारव्हेकर
Sunday, 9 August 2020

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतमाल विक्रीवर परिणाम झाला आहे.  वाघजाळी (ता. सेनगाव) येथील शेतकरी बालाजी तांबीले यांच्या एक एकरात निघालेल्या अकरा टन डाळिंब विक्रीस लॉकडाउनमुळे विक्रीसाठी अडचणी येत आहेत. दरवर्षी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे विकली जाणारे डाळिंब यावर्षी २० ते ३० रूपये दराने विकावे लागत आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने बाजार बंद चालू असल्याने खरेदीदार खरेदीसाठी पुढे येत नसल्याने हा फटका सहन करावा लागला. 

हिंगोली : कोरोनाच्या प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून यातून शेतकरीदेखील सुटले नाहीत. डाळींब उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी भावात घसरण झाल्याने फटका बसला आहे.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील युवा शेतकरी बालाजी तांबीले यांच्याकडे वडिलोपार्जित बारा एकर शेती आहे. ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात. यात सोयाबीन, कापूस, तुर, हरभरा, गहू, हळद ही पिके घेतात. त्यांच्या शेतात एक विहीर, बोअरवेल व एक पन्नी तळे आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच

बाजार बंद चालू असल्याने फटका 
सहा वर्षांपूर्वी त्यांनी एक एकरात डाळींबाची लागवड केली. राहुरी कृषी विद्यापीठातून डाळींबाची घुटी नावाची कलम आणून लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना डाळींबाचे चार टन उत्पन्न झाले. दुसऱ्या वर्षी सहा टन, तिसर्या वर्षी आठ टन असे दरवर्षी उत्पन्न वाढत गेले. मागच्या वर्षी चौदा टन डाळींबाचे उत्पन्न झाले. मागच्या वर्षी पन्नास ते साठ रुपये किलोचा भाव मिळाला तर चार लाखाचे उत्पन्न झाले होते. यावर्षी अकरा टन उत्पन्न झाले आहे. त्यासाठी पन्नास ते साठ हजारांचा खर्च झाला. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने बाजार बंद चालू असल्याने खरेदीदार खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शिर्डीजवळ असलेल्या राहता मार्केटमध्ये डाळींबाची विक्री केली. येथे वीस, तीस रुपये प्रमाणे किलोचा भाव मिळाला अकरा टन डाळींब विक्रीतून अडीच ते तीन लाख रुपये मिळाले आहेत. यावर्षी लॉकडाउनमुळे भावात घसरण झाल्याने उत्पन्न घटले आहे.

हेही वाचा - Corona Breaking ; परभणीचा आकडा हजाराला टेकला, दिवसभरात ८१ पॉझिटिव्ह

भाव कमी मिळाल्याने उत्पन्न घटले
यावर्षी लॉकडाउनमुळे डाळींब विक्रीसाठी अडचणी आल्या. राहता मार्केट येथे डाळींब विक्री करावी लागली. यासाठी खर्च आला, मात्र भाव कमी मिळाल्याने उत्पन्न घटले आहे. - बालाजी तांबीले, डाळींब उत्पादक शेतकरी. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video; Falling pomegranate selling prices hit farmers hard, Hingoli News