Video ः मुख्यालयी राहण्याची तंबी, मात्र जिवाची घेईना कोणी हमी

images
images

फुलवळ (जि.नांदेड) ः कंधार तालुक्यातील फुलवळ जिल्हा परिषद गटाच्या गावात अन्य शासकीय इमारतीबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडीअंतर्गत आरोग्य उपकेंद्राची इमारत असून येथे आरोग्य विभागाचे तीन कर्मचारी कार्यरत आहेत. ही इमारत सद्यःस्थितीला मोडकळीस आली असून इमारतीची आतून दयनीय अवस्था झाली आहे. शनिवारी (ता.१८) एप्रिलला दुपारी याच इमारतीत येथील कर्मचारी काही शासकीय अहवालाचे लिखाण करत बसले असता अचानक स्लॅबचा आतील भागाचा काही भाग गळून पडला. सुदैवाने, यात कोणालाही हानी पोचली नाही. वेळीच जर याकडे लक्ष दिले नाही तर कधीही काहीही घडू शकते, हे नाकारता येत नाही.

येथील आरोग्य उपकेंद्राची मूळ इमारत जवळपास २५ ते ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आली. त्यानंतर याची इमारतीच्या डागडुजीच्या कामासाठी शासनाकडून बरेच वेळा लाखोंचा निधी आला आणि तो खर्चही झाला.

बिले उचलून घेतली
येथे कुठल्याच मूलभूत सुविधा नसल्याने येथील आरोग्य उपकेंद्रावर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून येथे राहण्याची वेळ आली आहे. गावकरी व अधिकारी मात्र या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी तंबी देतात खरे, पण मोडकळीस आलेल्या इमारतीसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथे जीव मुठीत धरून कर्मचारी काम करतात. त्यात गुत्तेदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून थातूरमातूर कामे करून बिले उचलून घेतली.

डागडुजी झाली दोन वर्षांपूर्वी
दोन वर्षांपूर्वी याच इमारतीचे डागडुजीचे काम पूर्ण झाले, तेही मागे तसे पुढे. त्यामुळे मागच्याच पावसाळ्यात सदर इमारतीच्या छतातून पाणी गळत होते. याविषयी संबंधितांना येथील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तशी माहितीही पुरविली. परंतु, एकदा काम पूर्ण करून गेलेला गुत्तेदारही तिकडे फिरकला नाही, ना त्या कामावर पाहणी करून बिल तयार करून दिलेला अधिकारीही इमारत पहायला आला नाही.

हेही वाचा - सोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे !

अडचणी जाणून घेण्यास वेळ नाही
सध्या सर्वत्र ‘कोरोना’च्या जीवघेण्या आजाराने हाहाकार घातल्याने आजघडीला गावकऱ्यांसह आरोग्य विभागालाही आपले आरोग्य कर्मचारी हे मुख्यालयी राहावे असेच वाटत असून शासन स्तरावरून तसे आदेशही काढण्यात आले आहेत. परंतु, येथील कर्मचाऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत या जाणून घ्यायला कोणाकडेही वेळच नाही.

हेही वाचा - कोरोना : गावच्या वेशितच ग्रामसुरक्षादलाचा पहारा


कामकाजाचा आलेख नेहमीच चढता
तसे पाहता या आरोग्य उपकेंद्राचा कामकाजाचा आलेख पाहता कंधार तालुक्यातील इतर उपकेंद्रापेक्षा नेहमीच चढता असतो. कारण प्रसूती असो, का कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया, त्यात त्यांचा वार्षिक अहवाल हा उद्दिष्ट पूर्तीचाच असतो. याशिवाय अन्य आरोग्य सुविधा देण्यातही येथील कर्मचारी कधीच कमी पडत नाहीत. सध्या तरी ‘कोरोना’च्या तांडवात हे कर्मचारी गावात बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाइनचा स्टॅम्प घरोघरी जाऊन मारून सावधगिरी कशी बाळगावी, यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com