Video: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी शिक्षकांची धडपड...कशी ते वाचा...

शिवचरण वावळे
बुधवार, 15 एप्रिल 2020

खेड्यात आणि अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय? असा प्रश्न शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा काळजीत टाकणारा होता आणि ग्रामिण भागातीव शिक्षकांनी आहे त्यातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी काही तरी मार्ग काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत.  

नांदेड : ग्रामिण भागातील मुले शिक्षण प्रवाह पासून दुरावली जाणार नाहीत याची सर्व ती खबरदारी म्हणून पालकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून त्यांना धडे दिले जात आहेत. परंतु ज्यांच्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही त्या पालकांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सूचना दिल्या जात आहेत. अशी माहिती मुखेड तालुक्यातील बेरळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सहशिक्षक अनंत शिरंजीपालवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

लॉकडाऊनच्या काळात देखील शहरातील मुलांना घरी बसून इंटरनेट, टॅब, स्मार्टफोनच्या माध्यमातून सर्व त्या अभ्यासाच्या सुविधा अगदी सहज मिळणे शक्य होत आहे. त्यामुळे मुले घरी राहुन पालकांच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, शहराच्या तुलनेत गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे खूप कसरत करावी लागते. सध्या गावाकडे शिक्षकांची धडपड सुरु असली तरी, अनेक पालकांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने त्यांना अडचणी सामना करावा लागत आहे. 

हेही वाचा- श्री केदारनाथ मंदिरासाठी ‘ही’ ठरली महत्वाची बाब...कोणती ते वाचा....

पालकांजवळ स्मार्टफोन नसल्याने अडचणी
अनंत शिरंजीपालवार यांच्यासारखे अनेक शिक्षक आज वाडी, तांडे, वस्तीवर जाऊन पालकांचे मोबईल नंबर घेऊन त्याद्वारे अभ्यास पूर्ण करुन घेण्यासाठी धडपड करत आहेत. शिक्षक कितीही धडपड करत असले तरी, ग्रामिण भागातील शाळा बंद असल्यापासून अनेक विद्यार्थी आईवडीलांसोबत थेट शेतीच्या कामासाठी किंवा त्यांच्या सोबत शेतावर जात आहेत. अनेक पालकांजवळ ॲन्ड्रॉईड मोबाईल देखील नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण द्यायचे कसे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. असे असले तरी, शिक्षकांनी अजूनही हार मानली नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक मिळताच त्याची साधा व ॲन्ड्रॉईड मोबाईल अशी दोन प्रकारची वर्गवारी करुन अभ्यास देण्यासाठी धडपड करत आहेत. 

 

 अभ्यासाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न
लॉकडाऊनमुळे ग्रामिण भागातील मुले पालकांसोबत शेतीवर जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आमची धडपड सुरु आहे. पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना अभ्यासाकडे पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तो हळूहळू सफल होताना दिसून येत आहे.
- अनंत शिरंजीपालवार, शिक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: How to Read Teacher Lessons for Students in Rural Areas,nanded news