श्री केदारनाथ मंदिरासाठी ‘ही’ ठरली महत्वाची बाब...कोणती ते वाचा....

अभय कुळकजाईकर
बुधवार, 15 एप्रिल 2020

बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्री केदार जगद्‍गुरुंना वाहन प्रवास परवाना मिळवून दिला आहे. 

नांदेड - बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ येथील जगद्‍गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येते. परंतु श्री केदार जगद्‍गुरु कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे नांदेड येथे अडकून पडले आहेत. या धार्मिक प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळे आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने श्री केदार जगद्‍गुरु यांना तसेच त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांना उत्तराखंड राज्यात जाण्याचा शासनाने परवाना दिला आहे. हा परवाना पालकमंत्री चव्हाण यांनी बुधवारी (ता. १५) श्री केदार जगद्‍गुरु यांच्याकडे सुपुर्द केला. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हेही वाचा - Video- लॉकडाउनचे नियम पाळा अन्यथा...- एसपी मगर

अक्षयतृतीयेला उघडते मंदिराचे कपाट 
श्री केदारनाथ मंदिराचे दरवर्षी दिवाळीला कपाट बंद होत असते. त्यानंतर अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येते. हे दोन्ही धार्मिक विधी श्री केदारजगद्‍गुरु यांच्या हस्तेच होत असतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर श्री केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट श्री केदार जगद्‍गुरु यांच्याकडे तो सहा महिने असतो. अक्षयतृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा श्री केदारनाथांच्या मुर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे श्रीकेदार जगद्‍गुरु यांना अनन्यसाधारण महत्व आहे. 

लॉकडाऊनमुळे झाली अडचण
या सोहळ्यास जाण्यासाठी श्री केदार जगद्‍गुरु यांनी सर्व तिकिटे आधीच आरक्षीत केली होती. परंतु कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. अशा वेळी निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रवास परवाना मिळूवन दिला. श्री केदार जगद्‍गुरु यांच्या समवेत स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी हे ही जाणार आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना मुक्ती साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे

प्रवास परवाना केला सुपुर्द
श्री केदार जगद्‍गुरु यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवास परवाना बुधवारी (ता. १५) सुपुर्द केला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती. प्रवास परवाना मिळाल्यामुळे आता त्यांचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the important thing for Shri Kedarnath Temple ... Read what ..., Nanded news