Video : पूजा-अर्चा करून साईचरणी ‘कोरोना’चा नायनाट करण्याची प्रार्थना

धनंजय देशपांडे 
Friday, 17 April 2020

‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन असल्याने एरवी भाविकांनी गजबजलेली मंदिरेही आज ओसाड पडली आहेत. पाथरीतील साई मंदिरात भाविकांविना दररोज आरती केवळ पुजारी करित आहेत. 

पाथरी : ‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन असल्याने एरवी भाविकांनी गजबजलेली मंदिरेही आज ओसाड पडली आहेत. साई जन्मभूमी असलेल्या पाथरीतील साई मंदिर बंद करण्यात आल्याने रोजच शेकडो भाविकांच्या उपस्थितीत होणारी पूजा व आरती आज केवळ पुजारी व एक कर्मचारी नित्यनेमाने पार पाडत आहेत.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असून सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी साई जन्मभूमीच्या वादाने पाथरी जगाच्या नकाशावर झळकले. सध्या पाथरीवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या साई मंदिरात लॉकडाउनच्या काळात शुकशुकाट आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

दोनच व्यक्ती मंदिरात पुजा-अर्चा करतायेत  
नेहमीच भाविकांच्या गर्दीने गजबजलेल्या साई मंदिरात आज नित्य पूजा-अर्चा केवळ एक पुजारी व एक कर्मचारी, असे दोनच व्यक्ती पार पाडत आहेत. दरवर्षी हजारो भक्तांच्या गजरात पार पडणारा रामनवमी कार्यक्रम यंदा होऊ शकला नाही. आज साई मंदिर बंद असले तरी मंदिरात दररोजची पूजा - अर्चा नित्यनेमाने होत आहे. या मंदिरात सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री आरती होत असते. हा नित्य असंख्य भाविकांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम आजघडीला केवळ एक पुजारी व एक कर्मचारीच पार पाडत आहेत. येथील साई मंदिरात रामनवमी व साईबाबांचे कुलदैवत असलेल्या हनुमानाची जयंती प्रथमच मोठ्या प्रमाणावर झाली नाही. मंदिरातील पुजारी योगेश इनामदार म्हणाले, मंदिरातील पूजा-अर्चा नियमितपणे सुरू असून आम्ही देवाकडे ‘कोरोना’ आजाराचा नायनाट करण्यासाठी प्रार्थना करतो आहोत.

हेही वाचा - लॉकडाऊन : नांदेडमध्ये नऊ वऱ्हाडींच्या उपस्थितीत उरकला विवाह

मोठा निधी मिळाला नाही...
पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून त्यादृष्टीने पाथरी शहराचा फारसा विकास झाला नाही. शासनाने तीर्थक्षेत्र विकासासाठी या मंदिराची निवड केली असली तरी आजपर्यंत मोठा निधी प्राप्त झाला नाही.

राष्ट्रपतींची साई जन्मभूमीला भेट...
बिहारचे तत्कालीन राज्यपाल तथा विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई जन्मभूमीला भेट दिली होती. त्या वेळी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी श्री.कोविंद यांची भेट घेऊन साई जन्मभूमीच्या विकासासाठी त्यांच्याकडे साकडे घातले होते. त्यावेळी कोविंद यांनी राज्य सरकारला पाथरीचा विकास करण्याच्या सूचना केल्या होत्या.

विकास निधीच्या अपेक्षा मावळल्या...
पालिका प्रशासनाने सादर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी (ता.नऊ) जानेवारी २०२० रोजी मंजुरी दिली होती. त्यानुसार नवीन आर्थिक वर्षात हा निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. परंतु, ‘कोरोना’ महामारीमुळे साई जन्मभूमीच्या विकासावर अनिश्चित काळासाठी पडदा पडतो की काय ? असा प्रश्न साई भक्तांना पडत आहे. 

 

भाविकांना प्रवेश बंद
‘कोरोना’ विषाणूला रोखण्यासाठी जे लॉकडाउन सुरू आहे, त्याचे साई मंदिर समितीकडून काटेकोरपणे पालन केले जात आहे. मंदिरात नित्य पूजा-अर्चा सुरू असून भाविकांना प्रवेश बंद आहे. - सीताराम धानू, अध्यक्ष, साई स्मारक समिती, पाथरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Prayer-worshiping Prayer to destroy 'Corona' parbhani news