व्हिडिओ : कोरोनाच्या लढ्यासाठी योग, आयुर्वेदाचा सुरेख संगम  

file photo
file photo

परभणी : प्रतिकारशक्तीचा संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे. जीवनशैली म्हणजे आपला आहार आणि व्यायाम. या संकटात आपण अंतर्मुख होऊन आपल्या जीवनशैलीचा विचार केला पाहिजे आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत, असा सल्ला परभणी येथील आयुर्वेदाचार्य 
डॉ. अनिल रामपूरकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना  दिला.

कोरोनाच्या काळात आयुर्वेद आणि योगशास्त्राचा अंगिकार करून आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, याबद्दल परभणी येथील आयुर्वेदाचार्य डॉ. अनिल रामपूरकर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधत उपयुक्त अशी माहिती दिली. ते म्हणाले की, सध्याच्या काळात आपण बघितले असेल की ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली, ते या आजाराचा सामना करतात आणि बरेही होतात. 

प्राणायाम, ध्यानधारणा करा

या प्रतिकारशक्तीचा संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहार - विहारात काय बदल करायला हवेत याचे दिशानिर्देश आयुष मंत्रालयाने जाहीर केले आहेत. प्रत्येक वेळी पाणी कोमट करून प्यावे. माठातील, फ्रीजमधील पाणी पिऊ नये. दररोज योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा कमीत कमी ३० मिनिटे करावी. स्वयंपाक करताना हळद, जिरे, कोथिंबीर / धने आणि लसूण अशा मसाल्यांचा वापर करण्यात यावा. यामुळे कफ तयार होत नाही. सकाळी उपाशीपोटी च्यवनप्राश खावे. च्यवनप्राश खाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास काहीही खाऊ/ पिऊ नये. हर्बल चहा: तुलसी/ दालचिनी/ काळी मिरी, सुंठ पावडर आणि मनुका, गूळ  किंवा लिंबू रस घालून हर्बल चहा सकाळ, सायंकाळ प्यावा. सोनेरी दूध: अर्धा चमचा हळद पावडर १५० मिली गरम दुधामध्ये मिसळून दिवसातून एक किंवा दोन वेळेस प्यावे.

नाकपुड्यांमध्ये सकाळ, सायंकाळ लावा तेल
तीळ तैल/ खोबऱ्याचे तेल किंवा शुद्ध तूप नाकपुड्यांमध्ये सकाळी आणि सायंकाळी लावणे. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा घालून गरम पाण्याची वाफ दिवसातून एकदा घ्यावी. हळद, त्रिफळा, ज्येष्ठमध यांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. लवंग पावडर गूळ किंवा मधासोबत मिश्रण करून दिवसातून दोन-तीन वेळा खावी. हा उपाय साधा खोकला किंवा घश्यात खवखव होत असल्यास करण्यात यावा. मात्र, लक्षणे कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना श्वसन संस्थेचे विकार वारंवार होतात किंवा कफाचे विकार वारंवार होतात किंवा सध्या झाले आहेत अशांनी गोड पदार्थ, भात, केळी, सफरचंद, काकडी, टरबूज या गोष्टी टाळणे चांगले राहील.

 नियमित योग करावा
आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असणारा योग हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. योगाच्या नियमित सरावाने होणाऱ्या अनेक फायद्यांमध्ये रोगनिवारक हा फायदा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की योग केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. जलनेती अथवा वमनधौती या शुद्धीक्रियांमुळे आपली श्वसनसंस्था, पचनसंस्था यांची कार्यक्षमता वाढते. आसनांच्या अभ्यासामध्ये एक हस्त कटिचक्रासन, हस्त उत्तानासन, हस्तपादासन, भुजंगासन  आदी आसनांचा सराव आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन आपण करायला हवा. तसेच प्राणायामाच्या अभ्यासामध्ये सूर्यभेदन, भस्त्रिका, उज्जायी हे प्राणायाम आवर्जून करायला हवेत. या प्राणायामामुळे आपली श्वसनशक्ती वाढते आणि आपण श्‍वसनसंस्थेच्या आजारांपासून दूर राहू शकतो.
 
योगक्रियांचा उत्कृष्ट परिणाम
सध्या आपण या कोरोनाच्या साथीमुळे नकारात्मकतेने ग्रासले जात आहोत. याचा परिणाम आपल्या मनावर होतो. या बाबींमुळे मनावर नकळत आलेला ताण काढून टाकण्यासाठी योगनिद्रा, अजपाजप, ध्यान आदी योगक्रियांचा उत्कृष्ट परिणाम होतो. परभणीतील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राने यासंबंधी एक संक्षिप्त योगिक अभ्यासक्रम तयार केला आहे. अनेक शिबिरांमधून शेकडो नागरिकांना याचे प्रशिक्षण दिले आहे. समाज माध्यमातून तो जगातल्या १९ देशांत व भारतातल्या सर्व प्रांतातील २० शहरांत पोचविला आहे. दोन एप्रिलला फेसबुकवर त्याचे लाईव्ह प्रशिक्षण देण्यात आले. आताही फेसबुकवरील ‘निरामय योग परभणी’ या पेजवर आपण तो अभ्यासक्रम पाहू शकता.

संकटातून बाहेर पडू
या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या हातातली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आणि त्यासाठी सांगितलेल्या आहार - विहाराच्या सूचनांचे पालन करणे. असे जर केले तर आपण या संकटातून निश्चितच बाहेर पडू.  हे सर्व आपल्याला आपल्या घरी बसूनच करता येईल. आपण आयुर्वेद आणि योग या भारतीय शास्त्रांचा अंगिकार करून कोरोनाच्या संकटापासून दूर राहुयात, असा सल्ला डॉ. रामपूरकर यांनी दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com