Vidhansabha 2019 : दोन्ही काँग्रेसच्या एकीचे बळ आशादायी

Osmanabad-Constituency
Osmanabad-Constituency

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात वीस वर्षांत यंदा प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. दोन्हीही काँग्रेसच्या एकीचे बळ विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का, याची आता उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांनी विधानसभेची तयारीही सुरू केली आहे.

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यात परजिल्ह्यातील बार्शी (जि. सोलापूर) आणि औसा (जि. लातूर) या मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उमरगा येथे शिवसेना, तुळजापूरला काँग्रेस, उस्मानाबाद आणि परंडा येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन्ही काँग्रेसची नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीत एकत्रित आल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा दोन्ही काँग्रेसला फायदा होऊन जागा राखण्यात यश मिळेल, असा अंदाज आहे.

विधानसभेसाठी उस्मानाबादेत २००९ आणि २०१४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यात अटीतटीच्या लढती झाल्या. यंदाच्या निवडणुकीत ते दोघे आमनेसामने होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, तर शिवसेनेकडून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. 

तुळजापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण आमदार आहेत. १९९९ पासून आतापर्यंतच्या निवडणुकांत ते सलग विजयी झालेत. येथे विविध पक्षांकडून इच्छुकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून चव्हाण हेच पुन्हा उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या राष्ट्रवादीत असलेल्या अशोक जगदाळेंनीही तयारी चालवली आहे. ते कोणत्या पक्षाकडून की अपक्ष लढतात, याची उत्सुकता आहे. चारपैकी भाजपकडे हा एकमेव मतदारसंघ असल्यामुळे इच्छुकांची गर्दी आहे.

उमरगा मतदासंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी २००९ आणि २०१४ मधील निवडणुकीत सलग विजय मिळवला. २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यापूर्वी प्रा. रवींद्र गायकवाड आमदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले. शिवसेनेने यंदा त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. हा नाराज गट आमदार चौगुलेंना मदत करणार का, याची उत्सुकता आहे. शिवाय शिवसेनेकडे सध्यातरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने पुन्हा चौगुलेच उमेदवार असतील. काँग्रेसकडून अद्यापही तुल्यबळ उमेदवाराचे नाव पुढे आले नसले तरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव यांची चर्चा आहे. औशाचे आमदार बसवराज पाटील यांचे वर्चस्व आहे. ते ठरवतील तोच काँग्रेसचा उमेदवार असेल.

परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राहुल मोटेंनी सलग तीनदा विजय मिळवलाय. एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने जम बसवला आहे. यंदाही आमदार मोटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उपनेते, विधान परिषदेचे सदस्य प्रा. तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.

निकाल ठरवणार उमेदवारी
मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत रंगली. यंदाच्या लोकसभेत हे दोघे समोरासमोर ठाकलेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच विधानसभेसाठी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल, हे कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com