राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत यंग ब्रिगेडला संधी

NCP
NCP

बीड - ‘विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जाईल,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आष्टी वगळता पाच मतदारसंघांतील उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर केली. त्यातही जुन्या-नव्यांची सांगड घातली गेली आहे. परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, गेवराईतून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर हे उमेदवार असतील.

पवार यांच्या उपस्थितीत येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला, त्या वेळी त्यांनी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. तरुणांच्या हाती सत्ता द्यायची आहे. उमेदवारी देताना निम्मेअधिक तरुण असतील. तरुण-ज्येष्ठांची सांगड घालण्यासाठीच माजलगावमधून सोळंके यांच्यासाठी आग्रह धरल्याचेही ते म्हणाले. आष्टी मतदारसंघाचा निर्णय आठ दिवसांत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीत परळीची जागा काँग्रेसच्या वाट्याची होती. धनंजय मुंडे यांच्यासाठी ती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:कडे घेतली. आष्टीत भीमराव धोंडे, सुरेश धस हे भाजपचे दोन आमदार असल्याने या मतदारसंघात हा पक्ष ताकदवान आहे. या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’कडून बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे प्रबळ दावा करीत आहेत. कदाचित, यामुळेच परळीच्या बदल्यात आष्टीची जागा काँग्रेससाठी सोडली जाण्याची शक्‍यता आहे.

उमेदवारांची पार्श्वभूमी
काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद दिले. प्रकाश सोळंके हे पहिले उपमुख्यमंत्री दिवंगत सुंदरराव सोळंके यांचे पुत्र. प्रकाश सोळंके यांनी तीनवेळा माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. नमिता मुंदडा या दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. विजयसिंह पंडित हे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे धाकटे पुत्र आणि ‘राष्ट्रवादी’चे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे बंधू आहेत. ते प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान देणारे त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागरही प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com