माजलगाव तालुक्यात बेपत्ता सरपंच पतीचा खून; मोटारसायकल सापडली, मृतदेहाचा शोध सुरू

कमलेश जाब्रस
Thursday, 3 December 2020

माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील रहिवाशी असलेले व मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेले मुकादम व ग्रामपंचायत सदस्य अंकुश भाऊराव राठोड (वय ४५ ) यांचा खून केल्याची कबूली आरोपीने दिली असून मृत व्यक्तीची मोटारसायकल सापडली.

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील केसापुरी तांडा येथील रहिवाशी असलेले व मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेले मुकादम व ग्रामपंचायत सदस्य अंकुश भाऊराव राठोड (वय ४५ ) यांचा खून केल्याची कबूली आरोपीने दिली असून मृत व्यक्तीची मोटारसायकल सापडली. परंतु मृतदेहाचा शोध सुरू असून आरोपीस आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. केसापुरी येथे पारूबाई अंकुश राठोड या सरपंच आहेत, तर त्यांचे पती अंकुश राठोड हे मुकादम व ग्रामपंचायत सदस्य आहेत. अंकुश भाऊराव राठोड हे मोटारसायकलवरुन (एमएच २३ एएल ९२७४) ता.१ नोव्हेंबरला उसतोडणी कामासाठी कोयत बांधण्यासाठी व एका ड्रायव्हरला आणण्यासाठी वाटुर फाटा (ता.परतुर, जि.जालना) येथे गेले होते.

ते पुन्हा परत आलेच नाही. या प्रकरणी शोध घेऊन ही ते न सापडल्याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबरला मुकादम अंकुश राठोड हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसांकडे देण्यात आला होता. यावर पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या नात्यातीलच व्यक्तीला ताब्यात घेवुन चौकशी केलली असता सदरील व्यक्तीने अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह व मोटारसायकल सावंगी येथील गोदावरी नदीपात्रात फेकुन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता त्यांना मृत राठोड यांची मोटारसायकल आढळुन आली. मात्र अंकुश राठोड यांचा मृतदेह सापडला नसुन शोध सुरू असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिन जणांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Chief Murdered In Majalgaon Block Beed News