स्वतःच्या विहिरीतून केला गावाला पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अमरापूर वाघुंडी (ता. पैठण) येथील गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ढाकेफळ (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी तथा विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिसोदे यांनी स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून स्वखर्चाने ग्रामस्थांना पाणी देण्याची सोय केली आहे. अमरापूर वाघुंडी या पुनर्वसित गावाची लोकसंख्या ७७३ आहे. यंदा भीषण दुष्काळाचे संकट ओढावल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली.

पैठण - दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अमरापूर वाघुंडी (ता. पैठण) येथील गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ढाकेफळ (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी तथा विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिसोदे यांनी स्वतःच्या मालकीच्या विहिरीतून स्वखर्चाने ग्रामस्थांना पाणी देण्याची सोय केली आहे. अमरापूर वाघुंडी या पुनर्वसित गावाची लोकसंख्या ७७३ आहे. यंदा भीषण दुष्काळाचे संकट ओढावल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली. या पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडे गावातील लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा मागणी केली. परंतु, यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पिंपळवाडी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या या गावातील पाणी प्रश्न कसा सोडवावा, असा प्रश्न समोर आला. नव्याने सरपंचपदी निवड झालेले शंकर वाघमोडे यांनी ग्रामस्थांसह प्रगतिशील शेतकरी अमर शिसोदे यांची भेट घेतली.

श्री. शिसोदे यांच्या शेतातील विहिरीतून गावाला पाणी देण्याची विनंती त्यांनी केली. क्षणाचाही विलंब न करता श्री. शिसोदे यांनी गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन स्वत:च्या शेतातील विहिरीतून पाणी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाइपलाइनचा खर्चही स्वतः करून गावाला पाणी पुरवठा सुरू केला. या कामाचा प्रारंभ रविवारी (ता. २८) ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सरपंच शंकर वाघमोडे, उपसरपंच भाऊ केदारे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबभाई शेख, अनंता माळवडे, शकिलभाई शेख, श्रीधर मोरे यांच्यासह संजय शिंदे, कडुबाळ डोळस, पाडुरंग शिंदे, नवनाथ शिंदे, बाळू शिंदे, गजू शिंदे, विठ्ठल शिंदे, नारायण चिंतामणी, कारभारी लंभाटे, मंगेश धमसपुरे, बद्री धमसपुरे, सुरेश धमसपुरे, गणेश साळुंके, शरद शिंदे, बंडू टेमक, महेंद्र वंजारे, गोरख भावले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: village Water supply in self well by amar shisode motivation Initiative