आघाडीचा पखवाजवादक विनय शंकपाळ यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

प्रसिद्ध पखवाजवादक गुरू माणिक मुंडे आणि कृष्णा महाराज आरगडे यांच्या तालमीत घडलेल्या विनयने अल्पावधीतच पखवाज वादनात प्राविण्य मिळवले. विद्यार्थीदशेत विद्यापीठाचा युवक महोत्सव, राजस्थान, गुजरात येथे झालेले केंद्रीय युवक महोत्सव, आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली होती.

औरंगाबाद : शहरातील आघाडीचा तरुण पखवाजवादक विनय भगवान शंकपाळ (वय 29) याचे रविवारी (ता. 10) अल्पशा आजाराने निधन झाले. नावाप्रमाणेच विनयशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या विनयच्या ऐन उमेदीत झालेल्या निधनाने शहरातील संगीतक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध पखवाजवादक गुरू माणिक मुंडे आणि कृष्णा महाराज आरगडे यांच्या तालमीत घडलेल्या विनयने अल्पावधीतच पखवाज वादनात प्राविण्य मिळवले. विद्यार्थीदशेत विद्यापीठाचा युवक महोत्सव, राजस्थान, गुजरात येथे झालेले केंद्रीय युवक महोत्सव, आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली होती. "ध्वन्यालोक पखावज' संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ वादनसेवा करणाऱ्या विनयने वेरुळ-अजिंठा महोत्सव, शारंगदेव समारोहासह देशभरात अनेक जाहीर कार्यक्रमांमधून कला सादर केली. नृत्यगुरू पार्वती दत्ता, पं. नाथराव नेरळकर, कण्णगी गोसावी यांनाही त्याने साथसंगत केली. ख्रिस्तधर्मीय साहित्याला संगीतबद्ध करण्याचे काम त्याने केले.

प्रकृति अस्वास्थ्यामुळे विनयवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कामगार कॉलनी, चिकलठाणा येथून सोमवारी (ता. 11) सकाळी दहा वाजता त्याची अंत्ययात्रा निघून चिकलठाणा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्याच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Vinay Shankpal is no more