घटक पक्षांना बाजूला सारणे, विश्वासात न घेणे हीच भाजपची रणनिती : विनायक मेटेंचा घणाघात

दत्ता देशमुख
Wednesday, 18 November 2020

पदवीधर निवडणुकीवरुन मेटेंची भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. विश्वासात न घेणे, घटक पक्षांना बाजूला सारणे ही भाजपाची रणनिती राहीली आहे. त्यामुळे भाजपच्या या रणनितीची उघडपणे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुऴात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

बीड : पदवीधर निवडणुकीत घटक पक्षाला केवळ गृहीत धरण्याचे काम भाजपने केले आहे. घटक पक्षाला बाजूला सारणे, त्यांना सोबत न घेणे ही भाजपची रणनिती आहे का, असा सवाल शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसंदर्भात मंगळवारी (ता. १७) शिवसंग्रामच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक श्री. मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी मेटे यांनी भाजपविरोधात उघ़ड नाराजी व्यक्त केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

श्री. मेटे म्हणाले, भाजपमधील काही लोक आपल्याच पक्षाची अडवणूक करून वेठीस धरतात. स्वत:ला पाहिजे तसेच निर्णय झाले पाहिजेत असा आग्रह धरतात, आणि त्यास महाराष्ट्र भाजप बळी पडत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला. पक्षाची अडवणूक करणाऱ्यांनाच मराठवाडा पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून यावा असे वाटत नसावे, म्हणूनच ते लोक भाजपच्या जवळची मंडळी दूर जातील असे निर्णय घेत आहेत किंवा घेण्यास भाग पाडत आहेत, असा आरोपही विनायक मेटे यांनी केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा लोकांच्या किती नादी लागायचे याचा भाजपच्या महाराष्ट्र नेतृत्वाने विचार करावा. काही लोकांचा स्वभाव असतो 'सूंभ जळाले तरी पीळ जात नाही' असा आहे. महाराष्ट्र तरी भाजप मित्रांना घटक पक्षांना सोबत घ्यायचे कि नाही याचा विचार करावा किंवा त्यांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहनही त्यांनी केले.  सदर परिस्थिती भाजप राज्य नेतृत्वाच्या कानी घालणार असून (ता.२५) नोव्हेंबर पर्यंत योग्य निर्णय घेऊन कळवावे असे देखील सांगणार असल्याचे मेटे म्हणाले. असे प्रकार वारंवार होता कामा नयेत याचीही आपण खबरदारी घ्यावी, असे भाजप नेतृत्वाला सांगणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Mete open displeasure with BJP