व्हीपनुसार करा मतदान; शिवसेना नेत्यांचे सदस्यांना आवाहन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता. एक) शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना करण्यात आले. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दुपारी दाखल केला. त्यानंतर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात युतीचा मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार संजय शिरसाट, प्रशांत बंब, संतोष दानवे, संदीपान भुमरे, मनीषा कायंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे संघटक भाऊराव देशमुख यांची
प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले, "अनेकांनी उमेदवारी मागितली होती. इच्छा व्यक्त करणे गैर नाही; मात्र एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी एकदिलाने काम करावे. प्रत्येकाने सावध राहून, व्हीपप्रमाणे मतदान करावे. स्वतः वर डाग लावून घेऊ नका,'' असे आवाहन केले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, मतदानात जालना जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल. ही निवडणूक संशय घेणारी आहे. त्यामुळे विरोधकांशी बोलू नका. तुमचे राजकीय करिअर धोक्‍यात आणू नका. जालन्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी प्रास्ताविक केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर विजय औताडे यांनी आभार मानले. 
 
अंबादास गरीब उमेदवार 
माजी खासदार खैरे म्हणाले, ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे. हिरवा रंग उधळणारे म्हणतात, सहा ठिकाणी विजय मिळवू, महापालिका ताब्यात घेऊ, आपण एकजूट दाखविली पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत युतीला जिल्ह्यातील नऊपैकी नऊ जागा जिंकायच्या आहेत. अंबादास दानवे व माझ्यात कुठलेही भांडण नाही; पण अंबादास गरीब आहे, त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका. 
 

व्हीप न पाळल्यामुळे कर्नाटकात नुकतेच 22 आमदारांचे निलंबन झाले आहे हे विसरू नका. या निवडणुकीत कोणी गडबड केली तर पुढच्या सभागृहात ते दिसणार नाही.

-विनोद घोसाळकर, संपर्कप्रमुख  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com